Nashik News : ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले थेट तडीपार | पुढारी

Nashik News : ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले थेट तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पशू-पक्षी, मनुष्यांसह निसर्गास घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी शहरातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मकरसंक्रातीनिमित्त पतंगप्रेमी पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मात्र, त्यासाठी काही जण नायलॉन मांजाचा वापर करताना दिसतात. नायलॉन मांजा तुटत नसल्याने किंवा नष्ट होत नसल्याने तो घातक ठरला आहे. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी बळी पडले किंवा गंभीर जखमी झाले आहेत, तर वाहनधारक, पादचारी व्यक्तींचा मृत्यू तसेच गंभीर जखमी झाले आहेत. नायलॉन मांजामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे नायलॉन मांजा निर्मिती, साठा व विक्रीवर बंदी आली आहे. तरीही छुप्या मार्गे नायलॉन मांजाचा साठा, विक्री होत आहे. त्यामुळे याआधी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांची यादी तयार करून त्यांतील ४२ जणांना शहरातून २० दिवसांसाठी तडीपार केले आहे.

पोलिस ठाणेनिहाय हद्दपार

आडगाव – ०३, म्हसरुळ ०२, पंचवटी ०२, भद्रकाली ०५, सरकारवाडा ०८, गंगापूर ०५, मुंबईनाका ०५, सातपूर ०१, अंबड, ०२ इंदिरानगर ०३, उपनगर ०३, नाशिकरोड ०२, देवळाली कॅम्प ०१ असे एकूण ४२ जण शहरातून २० दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहेत.

दुचाकीसह नायलॉन मांजा जप्त

सातपूर पोलिसांनी दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून दुचाकीसह नायलॉन मांजा जप्त केला आहे. ओम भामरे (रा. कामटवाडे) व ओम पवार (रा. शिवशक्ती चौक, सिडको) हे दोघे दुचाकीवरून फिरताना नायलॉन मांजा विक्री करताना आढळले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करून मांजा व दुचाकी जप्त केली. सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button