Dhule News : चिकसे येथे शेतकऱ्यांना ‘ड्रोन’द्वारे फवारणीचे प्रशिक्षण  | पुढारी

Dhule News : चिकसे येथे शेतकऱ्यांना 'ड्रोन'द्वारे फवारणीचे प्रशिक्षण 

पिंपळनेर (धुळे) पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) धुळे, कृषी विज्ञान केंद्र धुळे व जैन इरिगेशन यांचे संयुक्त विद्यमातून साक्री तालुक्यातील चिकसे येथे ठिबक सिंचन संच देखभाल व दुरुस्ती, तसेच ड्रोन द्वारे फवारणी या विषयावर जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. चिकसेतील प्रगतशील शेतकरी विजय चौधरी यांचे शेतावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनाथ कोळपकर, प्रकल्प संचालक, आत्मा धुळे हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी ठिबक संच देखभाल व दुरुस्ती या विषयावरील प्रशिक्षणाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ पंकज पाटील, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी ड्रोन टेक्नॉलॉजीचा कृषी क्षेत्रात वापर याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. शेती क्षेत्रात ड्रोनची निवड, खरेदी करताना घ्यावयाची काळजी, त्याचा वापरसंबंधीचे प्रशिक्षण व ड्रोन साठी शासन स्तरावरून मिळणारे अनुदान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जैन इरिगेशनचे गोविंद पाटील यांनी टिशू कल्चर टेक्नॉलॉजी व केळी लागवड याविषयी माहिती दिली तर, जैन इरिगेशनचे पिंपळनेर येथील वितरक तुषार जैन यांनी ठिबक सिंचन संच बसविताना संचाची डिझाईन, संच वापरताना घ्यावयाची घ्यावयाची काळजी, संचाची दुरुस्ती व देखभाल याविषयी मार्गदर्शन केले. हितेंद्र सोनवणे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ पंकज पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब गावित, उपविभागीय कृषी अधिकारी धुळे यांचेसह विनय बोरसे, तंत्र अधिकारी, स्मार्ट योजना, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, श्याम पगारे, मनोज चौरे, सरपंच दादाजी खैरनार, मा.उपसरपंच संजय जगताप, राजेंद्र खैरनार, अनंता अकलाडे, सरपंच उंभरे, कृषी अधिकारी चेतन सोनवणे, सुरेंद्रनाथ शिंदे यांच्यासह पिंपळनेर, चिकसे, जिरापुर, देगांव, दिघावे, उंभरे गावातील शेतकऱ्यांसोबतच तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी सदगीर, मंडळ कृषी अधिकारी, पिंपळनेर यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार मराठे, कृषी पर्यवेक्षक, निजामपूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक शिवाजी राऊत, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रांत पाटील, राहुल पाटील, कृषी सहाय्यक रवींद्र साबळे यांचेसह कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

Back to top button