धुळे: महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी | पुढारी

धुळे: महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

धुळे,  पुढारी वृत्तसेवा : शहरात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ आज (दि.१६) शिवसेनेचा ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला. या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे आंदोलन करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. डेंगीमुळे शहरात निरपराध नागरिकांचे बळी जात असल्याने मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताई गटाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक चिता रचून आपला रोष व्यक्त केला.

धुळे शहरात डेंग्यूमुळे सामाजिक कार्यकर्ते गौरव जगताप यांचा मृत्यू झाला. याबरोबरच खाजगी रुग्णालयात देखील तापाचे वाढते रुग्ण वाढत असल्याने दिसून आल्याने आज महानगरपालिकेवर शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा ताई गट तसेच महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते तथा माजी महापौर कल्पनाताई महाले यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून महानगरपालिकेच्या कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री तसेच हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, ललित पाटील, संदीप सूर्यवंशी, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप आदींनी ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक चिता रचून घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा 

Back to top button