Nashik Central Jail : सेंट्रल जेलमध्ये ‘जादू की झप्पी’ ; वातावरण झालं भावुक… | पुढारी

Nashik Central Jail : सेंट्रल जेलमध्ये 'जादू की झप्पी' ; वातावरण झालं भावुक...

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा, महात्मा गांधी जयंती आणि बंदी दिनानिमित्त नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातर्फे गळाभेट हा उपक्रम राबविण्यात आला. कारागृहातील पुरुष शिक्षा बंदी, महिला शिक्षा बंदी व महिला न्यायाधीन बंदी यांची 18 वर्षांखालील मुले, मुली, नात, नातू व भाऊ-बहीण यांना गळाभेटीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली. सकाळपासूनच कारागृहाबाहेर नातेवाइकांनी गर्दी केली होती. गळाभेटीमुळे बंद्यांना भेटता येणार असल्याने ते आनंदित झाले होते. यावेळी वातावरण अत्यंत भावुक झाले होते. (Nashik Central Jail)

संबधित बातम्या :

अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता, मध्य विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक यू. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मलबाड आणि सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला. मुंबई, नाशिक, मराठवाडा आदी भागांतून बंद्यांचे नातेवाईक सकाळपासूनच बंद्यांना भेटण्यासाठी आले होते. 200 बंद्यांनी गळाभेटीसाठी अर्ज केले होते. (Nashik Central Jail)

मुगुटराव यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे गेली चार वर्षे हा उपक्रम स्थगित केला होता. आता पुन्हा तो जोमाने सुरू केला आहे. गुप्ता यांनी आता दर सहा महिन्यांनी हा उपक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यंदा बंद्यांच्या दोन ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुले, मुली, नात, नातू, बंद्यांच्या भावाची मुले, बंद्यांची पत्नी, आई अशा रक्ताच्या नातेवाइकांना गळाभेटीसाठी परवानगी दिली होती. दरम्यान, गळाभेटीमुळे बंद्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. त्यांच्या पत्नी, मुले, मुली यांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बंद्यांतर्फे त्यांना मिसळपाव देण्यात आले, तर बंदीदिनानिमित्त कारागृहातर्फे बंद्यांना मिष्टान्न देण्यात आले.

बंद्यांचा ताणतणाव कमी

२०१६ साली तत्कालीन अपर महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय यांनी बंद्यांचा ताणतणाव कमी व्हावा, त्यांना जगण्याची उमेद मिळावी म्हणून गळाभेट उपक्रम येरवडा कारागृहात सुरू केला. त्यानंतर तो मुंबई, नागपूर, नाशिक आदी कारागृहांमध्ये सुरू केला. शिक्षा झालेल्या बंद्यांनाच या उपक्रमात सहभागी होता येते. याशिवाय बंद्यांना दर 15 दिवसांनी नातेवाइकांना भेटता येते. मात्र, त्यावेळी गळाभेट घेता येत नाही.

हेही वाचा :

Back to top button