Pune news : नाझरे धरणात अजूनही अत्यल्प पाणीसाठा | पुढारी

Pune news : नाझरे धरणात अजूनही अत्यल्प पाणीसाठा

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : सदैव दुष्काळी असणार्‍या पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे धरणात अजूनही अत्यल्प पाणीसाठा आहे. गेल्या आठ दिवसांत झालेल्या दमदार पावसाने कर्‍हा नदी वाहू लागली आहे. नदीचे पाणी नाझरे धरणात पोहोचले आहे. मात्र, हा प्रवाह कमी असल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. नाझरे धरणातून पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याचे पाणी दिले जाते, तर सुमारे तीन हजार एकर जमीन ओलिताखाली येते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा मृत साठ्याच्या खाली गेल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पुरंदर व बारामती तालुक्यात 56 गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 496 मिमी असून, आत्तापर्यंत तालुक्यात 309 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या : 

अनेक दिवस पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत होता. गेल्या आठ दिवसांत दमदार पाऊस झाला असून, आठ दिवसांत 146 मिमी पावसाची नोंद झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. कर्‍हा नदीला पाणी आल्याने नाझरे धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असणार्‍या या धरणात आजअखेर मृत साठ्याच्या खाली केवळ 114 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्या आठ दिवसांत केवळ 10 ते 15 दशलक्ष पाणीसाठा वाढला आहे. दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात धरण पूर्णक्षमतेने भरून वाहते. यंदा पावसाने ओढ दिल्याने उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य टक्के आहे. आता परतीच्या पावसावर धरण भरण्याच्या अपेक्षा आहेत.

एमआयडीसीच्या योजनेतील पाण्याचे फक्त आश्वासन
नाझरे धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्याने जेजुरीनगरीवर पाणीटंचाईचे संकट भीषण आहे. येथील नागरिकांना चार दिवसांनंतर पिण्याचे पाणी दिले जाते. वीर धरणावरून जेजुरी एमआयडीसीला दिलेल्या पाण्यातून जेजुरी शहराला पाणी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप या योजनेतून पाणी न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Back to top button