Pune News : रुंदीकरणानंतरही सिंहगड रस्त्याचा श्वास कोंडलेलाच! | पुढारी

Pune News : रुंदीकरणानंतरही सिंहगड रस्त्याचा श्वास कोंडलेलाच!

दत्तात्रय नलावडे

खडकवासला(पुणे) : लोकसंख्या वाढल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. तसेच काँक्रिटीकरण, डांबरीकरण करूनही नियोजनाअभावी या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

विक्रेत्यांचे अतिक्रमण

नांदेड फाटा ते खडकवासला धरणापर्यंतच्या रस्त्यावर गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस नेमले जात आहेत. मात्र, गावातील रस्त्यांवर कोणतीही व्यवस्था नाही. दुपारी चारनंतर भाजी विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ठाण मांडून बसतात. रिक्षा, दुकानदारांची वाहनेही रस्त्यांवर उभी केली जात असल्याने चौकाचौकांत वाहतूक ठप्प होत आहे.
  1. धायरी फाट्यापासून नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी फाटा, खडकवासला धरण चौक आदी ठिकाणांसह गावातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांसह  विद्यार्थी, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे व वाहतूक नियोजनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
  2. शनिवारी, रविवारी तसेच सुटीच्या दिवशी सिंहगड, पानशेत, खडकवासलाकडे जाणार्‍या पर्यटकांची वाहतूक प्रचंड प्रमाणात असते. खडकवासला धरणापर्यंतच्या परिसराचा महापालिकेत समावेश होऊनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. लगडमळ्यापर्यंत  सिंहगड पोलिस, तर नांदेड सिटीपासून  पुढे हवेली पोलिसांची हद्द सुरू आहे.
  3. नांदेड सिटी गेटसमोरील चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, ही यंत्रणा सध्या बंद आहे. एकाच वेळी मुख्य रस्त्याने भरधाव वाहने धावत असतात. त्याच वेळी नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारातून वाहने ये-जा करतात. गेटच्या दोन्ही बाजूला रिक्षा स्टँड तसेच बस स्टँड आहे. त्यामुळे चढउतार करणार्‍या प्रवाशांची गर्दी असते.
  4. वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिस व वॉर्डन नाहीत. समोरासमोरून येणार्‍या वाहनांची धडक होऊन अपघात होत आहेत. अशीच गंभीर स्थिती नांदेड फाटा ते नांदेड गाव रस्ता, किरकटवाडी फाटा ते गाव रस्त्यावर तसेच खडकवासला रस्त्यावर आहे.
सुटीच्या दिवशी तसेच वाहतूक कोंडी होणार्‍या ठिकाणी  पोलिस नियुक्त करण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
– हवेली पोलिस
नांदेड सिटी गेट, दळवीवाडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीने  विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.   सिग्नल नावालाच आहे. अपघाताचा धोका वाढला आहे. मोठ्या दुर्घटनांची भीती आहे.
– इंद्रजित दळवी, कार्याध्यक्ष, सिंहगड परिसर विकास समिती 
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसह मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या आहे. याबाबत संबंधित विभागाकडे सिंग्नल यंत्रणा, वॉर्डन नियुक्त करणे, अतिक्रमणे हटविणे   तसेच वाहतूक नियोजनाबाबत कळविण्यात येणार आहे.
– संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा

Back to top button