Nashik News : पोक्सोतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

Nashik News : पोक्सोतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विनयभंग व पोक्सोच्या गुन्ह्यात न्यायालयीन काेठडी मिळालेल्या संशयित आरोपीचा रविवारी (दि.१) पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओंकार पांडुरंग चारोस्कर (२०, रा. मातोरी, ता. नाशिक) असे मृत्यू झालेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, संशयिताच्या मृत्यूची माहिती समजताच मातोरी गावात समाजकंटकांनी काही दुकानांची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ओंकार चारोस्कर याच्यासह राहुल सीताराम लिलके (२०) व किरण शंकर काबडी (२०, तिघे रा. मातोरी) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात २७ सप्टेंबर रोजी पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात तिघांना अटक केली. गुरुवारी (दि.२८) तिन्ही संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तिघे मध्यवर्ती कारागृहात होते. शनिवारी (दि.३०) रात्री ओंकारची तब्येत बिघडल्याने त्यास उपचारासाठी कारागृह सुरक्षारक्षकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी (दि.१) सकाळी ६ वाजता ओंकारचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या नातलगांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत ओंकार आणि त्याच्या दोन्ही मित्रांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला. तसेच घटना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असताना तक्रारदाराची ओळख असल्याने तो गुन्हा म्हसरूळ पोलिस ठाण्यात दाखल केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, ओंकार चारोस्करवर खोटे आरोप करून त्याला अडकवणार्‍यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेत म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या परिसरात ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गावात तोडफोड झाल्याने तणावाचे वातावरण होते. नाशिक तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

पीडितेच्या नातलगांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा

विनयभंगातील संशयित आरोपी किरणचे वडील शंकर काबडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलीच्या आई, वडील व भावाने किरण व त्याच्या मित्रांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यामुळे नाशिक तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आई, वडिलांसह भावाविरुद्ध तालुका पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पेठ उपविभागीय अधिकारी कविता फडतरे या करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button