Chandrasekhar Bawankule : …म्हणून पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा सल्ला दिला : बावनकुळे | पुढारी

Chandrasekhar Bawankule : ...म्हणून पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा सल्ला दिला : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, पत्रकारांविषयी रविवारी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर बावनकुळे यांनी सोमवारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार हे समाजातील सन्मानिय घटक आहेत. चुकीची बातमी छापून येऊ नये यासाठी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बाजू योग्यरित्या समजावून सांगावी. त्यांच्याकडील इनपुटही महत्वाचे असतात. पत्रकार समाजाचे मतपरिवर्तन घडवू शकतात. यासाठीच मी पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. त्यात काहीही गैर नाही, असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी केला.

लोकसभा महाविजय अभियानांतर्गत नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी सोमवारी(दि.२५) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय पक्षाचा पार्लिमेंटरी बोर्ड ठरवेल. उद्या नाशिकची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली तर भाजप त्यांना मदत करेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ज्या जागा जातील त्यांनाही भाजपकडून मदत केली जाईल. आमच्या वाट्याला आलेल्या जागा जिंकण्यासाठी ते आम्हाला मदत करतील, असे नमूद करत जागा वाटपाबाबत महायुतीत कोणतेही वाद नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्ष ४५ प्लस जागा जिंकतील, असा दावाही त्यांनी केला.

…तर शरद पवार, उध्दव ठाकरेंनी ‘इंडिया’ आघाडी सोडावी

‘स्टॅलिनचे पूत्र उदयनिधी यांनी तामिळनाडू मध्ये हिंदु धर्म व संस्कृतीविषयी केलेल्या वक्तव्याला शरद पवार व उध्दव ठाकरे यांचे समर्थन असावे. उदयनिधी यांचे वक्तव्य शरद पवार व उध्दव ठाकरे यांना मान्य असेल तर, त्यांनी तसे जाहीर करावे, अन्यथा या वक्तव्याचा निषेध करत इंडिया आघाडी सोडावी, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याचा भाषा करणाऱ्यांसोबत पवार, ठाकरे मांडीला मांडी लावून बसत आहेत’, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा :

Back to top button