Bogus Doctor : नाशिक जिल्ह्यात ‘मुन्नाभाई’ची चलती, तीन वर्षात आढळले 27 बोगस डॉक्टर | पुढारी

Bogus Doctor : नाशिक जिल्ह्यात 'मुन्नाभाई'ची चलती, तीन वर्षात आढळले 27 बोगस डॉक्टर

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या तक्रारी येत असतानाच गेल्या दोन महिन्यांत चार, तर गत तीन वर्षांत २७ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाकडून या डॉक्टरांवर कारवाई आली आहे. मात्र, नियमित आढळणाऱ्या या बोगस डॉक्टरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य प्रश्न ऐरणीवर आला आहे. Bogus Doctor

दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एक बोगस डॉक्टर असल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी तहसीलदार यांनी चौकशी करत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आलोककुमार विश्वास असे या संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. तत्पूर्वी २३ ऑगस्ट रोजी कळवण तालुक्यातील दळवट गावामध्ये विकी जाधव नामक डॉक्टर प्रॅक्टिस करत असल्याचे समोर आले होते. खुद्द केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच गावात हा संशयित बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ उडाली होती. नांदगाव तालुक्यातील राजेंद्र विसपुते नामक बोगस डॉक्टरवर १४ ऑगस्ट रोजी कारवाई करण्यात आली. तर ८ जुलै रोजी साखसंद खैरनार नामक डॉक्टरवर सटाणा येथे कारवाई करण्यात आली. 

अशा बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव, तर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी आरोग्य हे सदस्य आहेत. ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यावर काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत.

विधानसभेत गाजला प्रश्न

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधानसभेत गाजला होता. आमदार राहुल आहेर आणि आ. नितीन पवार यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न मांडत अधिकारी कारवाई करत नसल्याचे सांगितले होते. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत कारणे स्पष्ट केली होती.

चार वर्षांपासूनच्या तक्रारी

२०२० मध्ये प्राप्त तक्रारी

निफाड २, बागलाण १, मालेगाव १

 

२०२१ मध्ये प्राप्त तक्रारी

नांदगाव ४, नाशिक १, मालेगाव १, नाशिक मनपा १,

 

२०२२ मध्ये प्राप्त तक्रारी

दिंडोरी १, इगतपुरी ७, सिन्नर २, मालेगाव १

 

२०२३ मध्ये प्राप्त तक्रारी

नांदगाव ३, क‌ळवण १, सटाणा १

बोगस डॉक्टरांचे प्रकार चुकीचे आहे. प्रशासनाला तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच त्याबाबत चौकशी केली जाते. संबंधितांचे परवाना, कागदपत्रे तपासले जातात. आक्षेपार्ह काही आढळल्यास लगेचच कारवाई करण्यात येते.

डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

 

हेही वाचा :

Back to top button