नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात; रस्ते खोदले ११३ किमी अन् डांबरीकरण केले… | पुढारी

नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात; रस्ते खोदले ११३ किमी अन् डांबरीकरण केले...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावर्षी रस्ते दुरुस्तीवर सुमारे बाराशे कोटींची उधळपट्टी करणाऱ्या नाशिक महापालिकेने यंदा देखील रस्ते डागडूजीसाठी एमएनजीएल कंपनीकडून प्राप्त १४० कोटी खड्यात घातले आहेत. एमएनजीएल कंपनीने शहरभर खोदलेल्या ११३ किमीच्या रस्त्यांपैकी ७३ किमी रस्त्यांवर खडीकरण केले तर, उर्वरीत ५० किमी रस्त्यावर डांबरीकरणाची ‘हातसफाई’ केल्याचे समोर येत आहे. परिणामी यंदाही नाशिककरांची ‘वाट’ बिकट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत गॅस पाइपलाइनसाठी शहरभर अत्यंत बेशिस्तपणे रस्त्यांची खोदाई केली. ३१ मेपर्यंत रस्ते खोदाईचा धडाका सुरू ठेवल्याने, यंदाही रस्ते दुरुस्तीच्या नावे उधळपट्टी केली जाईल असा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. हा संशय आता खरा ठरताना दिसतो आहे. कारण एमएनजीएल कंपनीकडून प्राप्त १४० कोटींच्या निधीमधून अद्यापपर्यंत खोदलेल्या निम्म्याही रस्त्यांची डागडूजी झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. एमएनजीएल कंपनीकडून शहरभर २४७ किलोमीटरच्या रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ११३ किलोमीटर रस्त्यांची खोदाई केली असून, उर्वरीत १३३ किलोमीटर रस्त्यांची खोदाई पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. दरम्यान, एमएनजीएल कंपनीने खोदलेल्या रस्त्यांपैकी आतापर्यंत महापालिकेने केवळ ७३ किलोमीटर रस्त्याचे फक्त खडीकरण केले असून, उर्वरीत ५० किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण केले आहे.

दरम्यान, १४० कोटींपैकी रस्ते दुरुस्तीसाठी १०४.७४ कोटी तर खडी, मुरूम पुरवठ्यासाठी विभागनिहाय ३५ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, दुरुस्तीचा हा प्रकार दिलाशापेक्षा तापदायकच ठरत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पुर्ती पोलखोल केली असून, डागडूजी केलेल्या रस्त्यांवरच मोठमोठे खड्डे बघावयास मिळत आहे. अशात मनपाने यंदाही रस्ते दुरुस्तीचा १४० कोटींचा निधी खड्यात (घशात) घातल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.

एमएनजीएल कंपनीने खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. खडीकरण आणि डांबरीकरण असे कामे सुरू असून, पुढील काही दिवसांमध्ये ते पूर्ण होणार आहेत.

-शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

चिखलात रस्ते, डांबरही झाले दिसेनासे

महापालिकेने डागडूजी केलेले बहुतांश रस्ते चिखलमय झाले असून, दुरुस्ती करताना रस्त्याच्या दुर्तफा पडलेली खडी आणि माती उचलण्याची कष्टही मनपाकडून घेतले गेले नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्या खड्यांवर डांबरीकरण केले आहे, ते पहिल्याच पावसात दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button