Ashadhi Ekadashi : असा झाला पालख्यांचा तीर्थक्षेत्र पंढरीत प्रवेश | पुढारी

Ashadhi Ekadashi : असा झाला पालख्यांचा तीर्थक्षेत्र पंढरीत प्रवेश

वाखरी पालखीतळ; विशेष प्रतिनिधी :  महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या सुमारे नऊ लाख वैष्णवांना घेऊन संतांच्या पालख्या बुधवारी दुपारी भोजनानंतर वाखरीचा निरोप घेऊन शेवटच्या पंढरपूर मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. वाखरी तळावर संतांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती.

प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी एक वाजता या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तिमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता.

श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी एक वाजता, संत तुकाराम महाराजांचा दीड वाजता तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा दोन वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. विसावा पादुका मंदिराजवळ संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ व संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे येऊन दाखल झाले होते. या संतांना माहेरी पंढरीस घेऊन जाण्यासाठी श्री पांडुरंगाचा निरोप घेऊन संत नामदेवराय येऊन पोहोचले होते. सायंकाळी चार वाजता एकनाथ महाराज यांचे इसबावी येथे उभे रिंगण पार पडले तर सायंकाळी सहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडले.

माउलींची पालखी भाटेरथात…

सर्वात शेवटी दुपारी दोन वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी साडेसहा वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले.

रिंगणाप्रसंगी माऊलीच्या नामाचा जयघोष…

पंढरी समीप आल्याने दिंड्या दिंड्यामध्ये टाळ, मृदंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता तर काही दिंड्यात विविध खेळ खेळले जात होते. इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माऊली माऊली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

पादुका शितोळे सरकारांच्या गळ्यात…

आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात घालण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेऊन शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मनमोहक व सुंदर दिसत होते.

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशीकळा लोपलिया ॥

असेच त्यांचे सुंदर रूप चंद्र, सूर्यापेक्षाही तेजस्वी दिसत होते. अंगकांती मेघाप्रमाणे निळी दिसत होती. वारंवार डोळे भरून त्यांचे रूप पहावे असेच वाटत होते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस.टी.बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकमार्गे रात्री पंढरीत मुक्कामी पोहोचल्या.

Back to top button