नाशिक मनपाचे विद्यार्थी १५ दिवसांनंतरही गणवेशाविनाच | पुढारी

नाशिक मनपाचे विद्यार्थी १५ दिवसांनंतरही गणवेशाविनाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले असले, तरी महापालिकेच्या एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नसल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल, ही घोषणा आता नावापुरतीच राहिली आहे. सध्या गणवेशाच्या फाइलचा प्रवास सुरू झाला असून, त्याला आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मनपा शाळांतील तब्बल २७ हजार १६० विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार असून, त्यासाठी शासनाकडून एक कोटी १८ लाख, तर महापालिकेने एक कोटीची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.

शासनाची ‘एक राज्य, एक गणवेश’ ही घोषणा बारगळल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाची घोषणाही हवेत विरली आहे. गणवेशासाठी प्राप्त निधीच्या फाइलचा प्रवास आता लेखाविभागाकडे सुरू झाला असून, तो आणखी किती काळ सुरू राहील हे सांगणे मुश्कील आहे. दरम्यान, समग्र शिक्षा अभियानांतर्गत भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या वार्षिक कार्य योजना आणि अंदाजपत्रकात नाशिक मनपा शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या अनुसूचित जाती, जमातीसह दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील १९ हजार ७५९ विद्यार्थ्यांसाठी एक कोटी १८ लाख ५५ हजारांचा निधी मंजूर केला आहे, तर खुल्या गटातील सात हजार ४०१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात एक कोटीची तरतुद केलेली आहे. एकंदरीत २७ हजार १६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश संचासाठी 600 रुपये दिले जाणार असून, पहिल्या टप्प्यात एका गणवेशासाठी 300 रुपये दिले जाणार आहेत.

दरम्यान, लेखाविभागाकडून मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे फाइल जाणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला जाणार आहे. या समितीत मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा समावेश असून, त्यांच्या माध्यमातून गणवेशाचे काम त्रयस्थ व्यक्तीकडे सोपविले जाणार आहे. यासर्व प्रक्रियेला आणखी बराच वेळ लागणार असल्याने विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

सध्या फाइल लेखाविभागाकडे असून, पुढील दोन दिवसांत फाइलचा प्रवास तपासणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. – बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी मनपा.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थी संख्या

विद्यार्थी प्रवर्ग                          विद्यार्थी संख्या                                   मंजूर अनुदान

मुली (सर्व)                                13 हजार 854                                  41 लाख 56 हजार 200

अनुसूचित जाती                         3 हजार 485                                 10 लाख 45 हजार 500

अनुसूचित जमाती                       2 हजार 367                                 7 लाख 1 हजार 100

बीपीएल मुले                               53                                              15 हजार ९००

खुला गट                                   7 हजार 401                                  1 कोटी

हेही वाचा:

Back to top button