संगीत ऐकणार्‍या गायी-म्हशी देतात अधिक दूध! | पुढारी

संगीत ऐकणार्‍या गायी-म्हशी देतात अधिक दूध!

चंदिगड : संगीत ही केवळ एक कला नसून त्यामध्ये त्यापेक्षाही अधिक असे काही तरी निश्चितच आहे. आपल्याकडे तर संगीत कलेचा वारसा सामवेदापासूनच आहे. संगीत हे आता एक उपचार पद्धती म्हणूनही वापरलं जातं. तणावपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक वेळा तज्ज्ञ म्युझिक थेरपीचा वापर करतात; पण हीच थेरपी गायी-म्हशींबद्दल वापरल्यास दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.

हरियाणामधील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनाल या संस्थेनुसार गाय आणि म्हशीला संगीत ऐकवल्यास त्या तणावमुक्त होतात आणि जास्त प्रमाणात दूध देतात. या संगीत थेरपीचा अनोखा वापर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माणसांना जसं संगीत ऐकायला आवडतं तसं गाय आणि म्हशींनाही संगीत ऐकायला आवडतं, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनाच्या शास्त्राने सांगितलं की, त्यांनी खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं की, गायीला संगीत ऐकायला आवडतं. त्यामुळे हा प्रयोग करण्याचा आम्ही विचार केला. हा प्रयोगाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. संगीत लहरी गायीच्या मेंदूतील ऑक्सिटोसिन हार्मोन सक्रिय करतात आणि त्याचा परिणाम त्या तणावमुक्त होतात. त्यामुळे त्या अधिक दूध देतात. खरं तर, हे संशोधन गायींना तणावमुक्त ठेवण्यासाठी केला जात होता.

त्या प्रयोगादरम्यान गायीच्या वर्तनात सकारात्मक परिणाम दिसून आला. या संशोधनातून असंही दिसून आलं की, संगीत ऐकल्यामुळे गायींना प्रचंड उष्णतेपासून आराम मिळतो. संगीत ऐकलं की, त्या निवांत बसतात. शिवाय ज्येष्ठ प्राणी शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष म्हणाले की, भगवान श्रीकृष्ण जेव्हा मुरली वाजवायचे तेव्हा गायी मंत्रमुग्ध व्हायच्या. याच थेअरीवर हा प्रयोग करण्यात आला आहे. ‘एनडीआरआय’ या संस्थेची स्थापना 1955 मध्ये झाली आहे. तेव्हापासून या संस्थेमध्ये प्राण्यांवर अनेक प्रकारचे संशोधन करण्यात येतं आहे. देशी गायींवरही अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगादरम्यान गायींना एका ठिकाणी बांधून ठेवण्यात येतं नाही. कारण, त्यांना बांधून ठेवल्यास त्या तणावग्रस्त होतात, असंही आशुतोष यांनी सांगितलं आहे. ‘एनडीआरआय’ची शाखा असलेल्या हवामान प्रतिरोधक पशुधन संशोधन केंद्राचे चार वर्षांपासून यावर संशोधन सुरु आहे. या प्रयोगासाठी हजारो दुभत्या जनावरांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनातून असं दिसून आलं की, संगीत ऐकल्याने प्राण्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. एवंढच नाही, तर त्यामुळे गायी आणि म्हशींचं दूध देण्याची क्षमता वाढते. दरम्यान, गायी आणि म्हशींना बांधून न ठेवण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button