नाशिक : विद्यार्थ्यांना लागणार इंग्रजीची गोडी, जिल्हापरिषदेचा 'स्पेलिंग बी' उपक्रम | पुढारी

नाशिक : विद्यार्थ्यांना लागणार इंग्रजीची गोडी, जिल्हापरिषदेचा 'स्पेलिंग बी' उपक्रम

नाशिक : वैभव कातकाडे

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्ये विकसित व्हावी, वाचनाची आवड तयार व्हावी, शब्दसंग्रह वाढावा व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच स्पेलिंग बी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल याबाबत पुढाकार घेत अमेरिकेच्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या धर्तीवर नाशिकमध्ये हा उपक्रम राबवत आहे. या स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाददेखील उल्लेखनीय असा आहे.

उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात ६ मे ते १४ जूनदरम्यान शालेयस्तरावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी स्पर्धेची तयारी करण्याचे सीईओ मित्तल यांनी सांगितले होते. या स्पर्धा तालुकास्तरावर होत असून, अंतिम फेरीत तालुक्यातील विजेते विद्यार्थी जिल्हास्तरावर खेळणार आहेत. या स्पर्धेत जो जिंकेल त्याला उत्कृष्ट पारितोषिकदेखील देण्यात येणार आहे. याअनुषंगाने १९ ते २९ दरम्यान तालुकास्तरावर, तर ३० जून रोजी जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरापासून विद्यार्थी स्पेलिंग बी स्पर्धेसाठी पाठांतरातून इंग्रजी शब्दसंचय वाढवताय. या स्पर्धेसाठी ४ गट तयार करण्यात येणार असून, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा एक गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा गट, पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा तिसरा गट व इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा चौथा गट करण्यात आला आहे.

स्पेलिंग बी स्पर्धेची रचनादेखील चार स्तरांवर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची पहिली स्पर्धा ही शालेयस्तरावर होणार आहे. शालेयस्तरावर प्रथम येणारे विद्यार्थी हे केंद्रस्तरावर सहभागी होतील, केंद्रस्तरावर सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम येणारे विद्यार्थी हे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तालुकास्तरावरील स्पर्धेत पारदर्शकता राहावी यासाठी एज्युकेशन कन्सेप्ट ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेमार्फत तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातून तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येऊन प्रथम आलेला विद्यार्थी हा जिल्हास्तरावर सहभागी होणार आहे.

१९ ते ३० जूनदरम्यान होणार स्पर्धा

१९ जून : संपूर्ण जिल्ह्यात शालेयस्तरावर स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन

२० जून : केंद्रस्तरावर स्पर्धा

२२ ते २७ जून : तालुकास्तरावर स्पर्धा

३० जून : संपूर्ण जिल्ह्याची स्पर्धा कालिदास कलामंदिर, नाशिक येथे

संपूर्ण जिल्ह्यातून चारही गटांतील ६० विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाची स्पर्धा होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्रजी विषयाची मोठ्या प्रमाणात भीती असते. त्यामुळे न्यूनगंडाची भावना तयार होत असते. ही भीती घालवण्यासाठी निखळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी प्रतिसाददेखील खूप चांगला दिला आहे. ही स्पर्धा प्रथमच राबविली जात असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात उत्सुकता आहे.

– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी

हेही वाचा : 

Back to top button