गोवा : पर्यटकाला लुबाडणार्‍या 12 दलालांना अटक | पुढारी

गोवा : पर्यटकाला लुबाडणार्‍या 12 दलालांना अटक

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पर्यटनस्थळी व किनारी भागात पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांची लुबाडणूक करणार्‍या 12 दलालांना (टाऊट्स) गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अटक केली आहे. गुरुवारी (दि.15) ही कारवाई उत्तर गोवा किनारी भागात करण्यात आली. अटक केलेल्या दलालांना पर्यटन खात्याने 2 हजार रुपये दंड ठोठावून सुटका केली आहे.

पर्यटन खाते व पोलिस यांनी हल्लीच कारवाई करीत अशाच प्रकारे 16 दलालांना अटक केली होती. तर त्यापूर्वी 21 दलालांना अटक केली होती. काल यावर्षीच्या तिसर्‍या कारवाईत 12 दलालांना अटक करण्यात आली. गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र असल्याने येथे लाखो पर्यटक येतात. अशा पर्यटकांना विशेषत: किनारी भागात येणार्‍या पर्यटकांना गाठून त्यांना विविध आमिषे दाखवून लुटण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार पर्यटन खात्याकडे आल्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या दलालावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई आणि उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर, नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल ही कारवाई केली. व पणजी, कळंगुट, हडफडे, मोरजी आदी परिसरात एकूण 12 दलालाना अटक केली.

अटक केलेल्या दलालांची नावे पुढील प्रमाणे – प्रदीप धनाप्पनावर (सांपेंद्र), इम्रान खान (बायंगिणी), आरीफ खान (खोर्ली), जिजस आम्मेलो (सांत इस्तेव) , सुलेमान इम्मुसाबनवर (ताळगाव), कुदबुदीने अलीसाब (करंझाळे), इम्रान शिपाय (पणजी), सुलतान रेहमान (कलकत्ता), हुसेन उदीन (आसाम), गंगाधर पुजर (कर्नाटक), संतोष राठोड (कलंगुट) आणि दिलीप राठोड (उत्तर प्रदेश)

Back to top button