राहाता : लबाड लांडग्यांचे ढोंग वेळीच ओळखावे : विखे पाटील

राहाता : लबाड लांडग्यांचे ढोंग वेळीच ओळखावे : विखे पाटील
Published on
Updated on

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्री.गणेश कारखान्याला जिल्हा सहकारी बँकेतून कर्ज देण्यास विरोध करणार्‍यांचा हेतू तरी प्रामाणिक आहे का? यांना सभासदांची नव्हे तर स्वत:च्या राजकारणाची चिंता आहे. कोपरगाव, संगमनेरात झाली नाहीत अशी विकासाची कामे आता राहाता तालुक्यात होत असल्याची असुया यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यक्तीव्देशापोटी एकत्रित आलेल्या या लबाड लांडग्यांचे ढोंग वेळीच ओळखा, असे आवाहन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर जनसेवा मंडळाच्या प्रचाराची सांगता वाकडी येथे माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन कापसे, शिवाजीराव धुमाळ, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, दिपक पठारे, संगमनेर शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, मुकूंदराव सदाफळ, प्रतापराव जगताप, डॉ. भास्करराव खर्डे, दत्ता कोते, साहेबराव निधाने, संदिप देशमुख आदि याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रचाराच्या अखेरपर्यंत विरोधकांकडून कारखाना कोण चालविणार? याचे उत्तर सभासदांना मिळू शकलेले नाही. निवडणूकीत यांची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. केवळ व्यक्तिव्देशापोटी एकत्रित आलेल्यांनी सभासदांची दिशाभूल करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू गणेश कारखान्याचा सभासद हा सुज्ञ आणि जागरुक असल्याने मतदानाच्या माध्यमातून बाहेरुन आलेले हे पाहुण्यांचे पार्सल पुन्हा संगमनेर आणि कोपरगावला पाठविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गणेश कारखान्याच्या बाबतीत या लोकांना कधीच आत्मीयता नव्हती, याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा बँकेचा संदर्भ देवून या कारखान्याला कर्ज देण्यासाठी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी कसा विरोध केला होता, याचे कागदच सभेमध्ये दाखवून गणेश कारखान्याच्या बाबतीत तुमचा तरी हेतू प्रामाणिक आहे का? असा थेट सवाल केला. यापुर्वी कारखाना बंद होता, तेव्हा तुम्ही चालविण्यास का घेतला नाही. परंतू मागील 8 वर्षात प्रवरा कारखान्याने गणेशच्या सभासदांसह कामगारांची सुध्दा देणेदारी देवून हा कारखाना उत्तम पध्दतीने चालविला आहे. कोल्हे पॅटर्नच्या नावाखाली तुम्ही केवळ फसवणूक केली, असा थेट आरोप त्यांनी केला.

आज कारखान्याच्या निमित्ताने आलेल्या या पाहुण्यांनीच गणेशच्या कार्यक्षेत्रातून ऊस पळवून नेला, यांना कारखान्याच्या सभादांची काळजी नाही तर केवळ आपल्या बगलबच्यांनी काळजी आहे. कोपरगावकरांना त्यांच्या 11 गावांचे पडले आहे तर संगमनेरला राहाता तालुक्याच्या विकासाची घडी उध्वस्त करायची आहे. कारण या तालुक्यात होत असलेला विकास यांना आता पाहावत नाही.

राहाता तालुक्यात जी विकासाची प्रक्रीया घडत आहे, ती कोपरगाव आणि संगमनेरमध्ये दिसत नाही. या विकासाची असूयाच यांच्यामध्ये निर्माण झाली असून, गणेश कारखान्याच्या नावाखाली या लबाड लांडग्यांची ढोंग आता पाहायला मिळत असल्याची टिका त्यांनी केली.
यापुर्वीच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांचे प्रायचित यांना भोगावे लागणारच आहे.

तुम्ही त्यापासून पळ काढू शकणार नाही, असा थेट इशारा देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, आज निळवंड्याचे पाणी लाभक्षेत्रात आल्याने या भागात खर्‍याअर्थाने विकासाची समृध्दी निर्माण होणार आहे. परंतू निळवंड्याचे श्रेय घेणार्‍यांनीच मंत्री असताना समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक मांडून हा काळा कायदा नगर जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविला. हक्काचे पाणी यांनी मराठवाड्याला देवून टाकल्याने या भागाचे मोठे नुकसान झाले त्याची जबाबदारी सोयीस्कररित्या टाळली जात असल्याची टीका त्यांनी केले.

खंडकरी शेतकर्‍यांच्या जमीनी विनामोबदला भोगवटा वर्ग 1 करण्याचा निर्णय 15 जुलैपर्यंत आपण घेणार असून, यापुर्वी महसूल मंत्री असतानाही त्यांना हे करता आले नाही. उलट त्यांनी 15 टक्के रक्कम भरण्याची अट घातली होती, याकडे लक्ष वेधले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, गणेश कारखान्याची ही निवडणूक माणूसकीची, विश्वासाची आणि प्रश्नांची आहे.

या कारखान्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. विखे पाटील कारखान्याच्या सभासदांनी केलेला त्याग गणेशच्या सभासदांनी लक्षात घ्यावा. कारखाना कसा चालविला यापेक्षा आम्ही या भागातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिलो याला महत्व आहे. आज या निवडणूकीच्या निमित्ताने ज्या अदृष्य हातांची मदत होत आहे, त्यांचे कल्याण होईल. परंतू काही अदृष्य हातांचे काय करायचे हे येणारा भविष्य काळच ठरवेल असा इशारा दिला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news