Nashik : आजपासून शाळांची घंटा वाजणार! पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके | पुढारी

Nashik : आजपासून शाळांची घंटा वाजणार! पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा गुरुवार (दि.१५)पासून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दीड ते पावणेदोन महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांनर शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश घेताना बालकांना उत्साहवर्धक व आनंदी वातावरण दिसेल, यासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या दृष्टीने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कामाला लागले आहेत. मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या मदतीने शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था व स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेची व परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करून ‌घेण्यावर भर दिला आहे.

शाळेच्या परिसरात प्रभात फेरीसह विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनाही शाळेमध्ये आमंत्रित केले जाणार आहे. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांच्यामार्फत शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थांचा समावेशही करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिल्याच दिवशी शाळा उघडणार असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर येणे बंधनकारक राहणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

सुट्टीची मजा संपवून आता विद्यार्थ्यांनाही शाळेची ओढ लागली आहे. नवे शैक्षणिक वर्ग, नवा वर्ग, नवा अभ्यासक्रम, नवे वर्गशिक्षक, वेळापत्रक अशा विविध बाबी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी तयारी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button