Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी | पुढारी

Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कांदानगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांदा मालट्रकमध्ये भरण्यासाठी मजुरांना मोठे श्रम करावे लागतात. कांदा गोणी उचलण्यासाठी लोखंडी हुकचा वापर करावा लागतो. कांदा बाहेरगावी पाठविण्यासाठी गाडीमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात चढ- उतर झाल्याने बऱ्याचदा गोणीतील कांदा खराब होण्याची शक्यता असते. मात्र आता कांद्याची प्रतवारी चांगली राहण्यासाठी पहिल्यांदाच थेट मालट्रकमध्ये कांदा गोणी जाऊ शकेल, असे सरकते जिने असलेली मशीनरी येथील कांदा निर्यातदार मनोजकुमार जैन यांनी उपलब्ध केल्याने लासलगावचा कांदाही आता आधुनिकतेकडे वाटचाल करू लागला आहे.

लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथे साधारणपणे २,१०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल कांद्याच्या व्यवसायातून होते. देशांतर्गत व अनेक देशांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. त्यासाठी मजूरही मोठ्या संख्येने व्यापारी वर्गाला उपलब्ध करावा लागतो. मजुरांना मोठी मेहनत व कसरत करत गोणीमध्ये भरलेला कांदा मार्केटमध्ये लोडिंग करावा लागतो. यामध्ये वेळ जास्त जातो व श्रम वाढतात. पर्यायाने मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. अनेकदा गोणीतील कांदा वाहतुकीसाठी मालट्रकमध्ये भरताना तो लोखंडी हुकच्या साहाय्याने एक ते दोन ठिकाणी उचलून टाकावा लागतो. दोन-तीन ठिकाणी उचलल्यामुळे कांद्याचे साल निघून नुकसान होते.

यामुळेच येथील जैन एक्स्पोर्टचे संचालक कांदा निर्यातदार मनोजकुमार जैन यांनी खास इंदूर येथून स्वयंचलित सरकते जिने असलेले कांदा लोडिंग मशीन आणले आहे. त्यासाठी त्यांना ३ ते ४ लाख रुपये खर्च आला असून, आता कांदा लोडिंगसाठी मजुरांचे श्रम कमी होऊन वेळेतही बचत होत असल्याचे ते सांगतात. मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत असल्याने कांदा कंटेनरमधून मुंबईकडे पाठविला जातो. त्यासाठीही एक वेगळा सरकता जिना कांदा मार्केटमध्ये आणला असून, त्यासाठीही ४ ते ५ लाख रुपये वेगळा खर्च त्यांनी केला आहे.

लासलगावला मोठ्या प्रमाणात कांद्याची उलाढाल होत असल्याने अनेकदा रात्री-बेरात्री कांदा ट्रकमध्ये लोड करावा लागतो. त्यासाठी जास्त वेळ लागतो. कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध केल्याने मजुरांचे श्रम कमी होणार असून एक गाडी भरताना दोन तास वेळेची बचतही होणार आहे.

– मनोजकुमार जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

हेही वाचा : 

Back to top button