Lok Sabha Election 2024 | नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान | पुढारी

Lok Sabha Election 2024 | नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष आणि बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने अपक्ष, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार आहे. त्यामुळे माघारीच्या (दि.६) अंतिम मुदतीनंतरच दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंदा लक्षवेधी ठरत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी नाशिकच्या जागेवरून महायुतीत झालेला संघर्ष गोडसे यांचा विजयपथ काटेरी बनवणारा ठरला आहे. उमेदवारीच्या घोषणेला विलंब झाल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी त्यांना उमेदवारी न देण्याचा महायुतीचा निर्णय ओबीसी समाज तसेच समता परिषदेला पटलेला नाही. त्यामुळे गोडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भुजबळ समर्थकांकडून सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया महायुतीच्या चिंता नक्कीच वाढविणाऱ्या आहेत. भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला. आपण नाराज नसल्याचे वरकरणी भुजबळ सांगत असले तरी प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच त्यांची नाराजी कमी झाली की कायम होती, हे कळू शकेल. आमदार अॅड. राहुल ढिकले, दिनकर पाटील, केदा आहेर, डॉ. राहुल आहेर यांच्यासारखे दिग्गज इच्छूक असताना भाजपने केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हट्टाग्रहामुळे नाशिकच्या जागेवरील दावा सोडला असला तरी अंतर्गत धुसफूस कायम आहे. त्यातच शांतिगिरी महाराज यांनी दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होण्याचा धोका महायुतीला आहे. त्यामुळेच भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांना माघार घेण्यासाठी गळ घातली होती. परंतु, शांतिगिरी महाराज निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने महाजन यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. माघारीपर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवू, असे महाजन यांनी सांगितले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांनी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणारा आहे. मागासवर्गीय, मुस्लिम मतं महाविकास आघाडीचा मूळ आधार आहे. वंचितच्या उमेदवारामुळे या मतांची विभागणी होण्याचा महाविकास आघाडीला धोका आहे. त्याचा थेट फटका वाजे यांना बसू शकतो. त्यातच उमेदवारी एेनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी दाखल केलेला उमेदवारी अर्ज वाजे यांची डोकेदुखी अधिकच वाढविणारा आहे. या मतदार संघातील चारही उमेदवार मराठा असल्याने मराठा समाजाचा कौल कोणाला मिळणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. (Lok Sabha Election 2024)

गावित, चव्हाण यांचा कोणाला बसणार फटका?

देशभरात एकसंध असलेली इंडिया आघाडी महाराष्ट्रात मात्र फुटली. माकपचे जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी गावित यांची मागणी होती. परंतु, महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आल्याने शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत थेट शरद पवार यांना इशारा दिला आहे. त्यामुळे भगरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. भारती पवारांच्या कार्यपध्दतीवर चव्हाणांची नाराजी असून गेल्याच आठवड्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची पुन्हा एकदा खासदार होण्याची वाट खडतर होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –

Back to top button