Onion Prices : भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत | पुढारी

Onion Prices : भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : भारत बांगलादेश सीमा रेषा रविवारी (दि.४) १२ वाजल्यापासून खुली करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशला पाठवण्यास व्यापाऱ्यांना सोपे जाणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे घसरलेले भाव क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांनी वधरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मार्च २०२३ पासून भारत बांगलादेश सीमा रेषा बंद होती. यामुळे नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा कांदा बांगलादेशाला पाठवण्यासाठी अडचण येत होती. बांगलादेशात मागणी असूनही सीमा रेषा बंद असल्याने कांदा निर्यात करणे व्यापाऱ्यांना अवघड झाले होते. याचा फटका स्थानिक बाजारपेठांवर होऊन गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलने केली मात्र तरीदेखील बाजारभाव न वाढल्याने शेतकरी चिंतेत होता. आज भारत बांगलादेश सीमा रेषा खुली झाल्याने भारतातील कांदा बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केला जाणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याच्या भावात तेजी येणार असल्याचे सूतोवाच कांदा व्यापाऱ्यांनी दिले आहे. यांचे परिणाम सोमवार दि.५ रोजी होणाऱ्या कांदा लिलावात होऊन कांद्याचे भाव 300 ते 400 रुपये दराने वधारण्याची शक्यता आहे.

बांगलादेशात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी तेथील सरकारने कांद्याची आयात मार्च २०२३ पासून बंद केली होती. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशात पाठवणे बंद झाले होते. त्याचा फटका देशातील कांद्याच्या दरावर झाला होता. आता बांगलादेशातील कांद्याचे प्रमाण कमी झाल्याने तेथे कांद्याचे भाव वधारले आहे. यामुळे बांगलादेश सरकारने कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा विक्रीस वाव मिळणार असल्याने कांद्याच्या दरात ३०० ते ४०० रुपयांची क्विंटल मागे सुधारणाची शक्यता आहे.
– सुशिल पलोड, कांदा व्यापारी चांदवड.

Back to top button