जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा | पुढारी

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यात रविवारी (दि.4) दुपारी १२ च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. तर कुठे घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा जाणवत होता. सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत आहे. मात्र, रविवारी (दि.4) दुपारी १२ च्या सुमारास अचानक ढग दाटून आले, अन् वादळी वारा सुरु होऊन पावसाचे आगमन झाले. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.  वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर विज पुरवठाही खंडीत झाल्याचे पहावयास मिळाले. जळगाव जिल्ह्यात काय ठिकाणी मुसळधार तर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी मात्र पावसाबरोबरच गारा सुद्धा पडल्याचा पाहायला मिळाले आहे. पाचोरा तालुक्यातील सांगवी येथे गार पडल्याची माहिती मिळाली आहे.

वाहनांचे नुकसान…
जळगाव शहरात वादळी वाऱ्यामुळे रिंगरोड, अजिंठा विश्रामगृह आणि गोलाणी मार्केट परिसरातील झाडे कोलमडून पडली आहे. त्यामुळे काही चारचाकी व दुचाकींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पावसामुळे शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे मोठा वटवृक्ष उन्मळल्याने पार्किंगला लावलेल्या चारचाकी व दुचाकी दबल्या गेल्या. शिवाय शहरातील रिंगरोड आणि गोलाणी मार्केटजवळील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या बंगल्याजवळ देखील वादळीवाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडली आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

हेही वाचा:

Back to top button