नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सरकार आयोजित खारघर ये‌‌थील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वीस लाखांपेक्षा जास्त श्री सदस्य राज्यभरातून उपस्थित होते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली नव्हती. श्री सदस्यांना तासन्तास रणरणत्या उन्हात बसावे लागले. उष्माघातासह चेंगराचेंगरीमुळे १४ श्री सदस्यांचे मृत्यू झाले असून, 500 पेक्षा जास्त श्री सदस्य उपचार घेत आहेत. जनशक्ती जमवून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी राजकारणाला अनुकूल वातावरण तयार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डावपेच होता, असा आरोप शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी केला.

राज्य सरकार खारघर दुर्घटनेची जबाबदारी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर ढकलत आहे. सरकार या घटनेकडे गांभीर्याने पाहत नसून, त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे यांनी केली. पत्रकार परिषदेला डॉ. शोभा बच्छाव, स्वाती जाधव, राजेंद्र बागूल, ज्ञानेश्वर काळे, अल्तमश शेख, शरद बोडके आदी उपस्थित होते.

विशेष अधिवेशनासाठी राज्यपालांना साकडे

खारघर दुर्घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. या प्रकरणाची उच्च न्यायालयीन समिती नेमून चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे प्रदेश नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे ॲड. छाजेड यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button