तब्बल 4.5 लाख रुपयांचे कलिंगड | पुढारी

तब्बल 4.5 लाख रुपयांचे कलिंगड

टोकियो : उन्हाच्या रखरखाटात लालचुटूक, रसरशीत कलिंगडची फोड खाल्ल्याने रसना व तहान दोन्ही तृप्त होतात. अगदी 20 रुपयांपासून कलिंगड मिळते; पण एक असे कलिंगड ज्याची किंमत तब्बल 4.5 लाख रुपये आहे. या कलिंगडचे नाव ‘डेनसूक वॉटरमेलन’ असे आहे. त्याचा बाहेरून रंग काळा असतो म्हणून त्याला ‘ब्लॅक वॉटरमेलन’ असेही म्हणतात.

चव, बिया, तसेच बाहेरचा भाग वैशिष्ट्यपूर्ण असल्याने हे कलिंगड अन्य कलिंगडांच्या तुलनेत वेगळे ठरते. या कलिंगडाचे उत्पादन जेमतेमच होते. एक वर्षात सुमारे 100 कलिंगडांचे उत्पादन होते. त्यामुळे हे कलिंगड दुर्मीळ मानले जाते. खाण्यासोबतच हे कलिंगड गिफ्टही केले जाते.

महाग असल्याने हाय प्रोफाईल सेलेब्रिटिजना गिफ्ट म्हणून हे कलिंगड दिले जाते. अन्य कलिंगडांप्रमाणे बाजारात याची विक्री केली जात नाही. या खास कलिंगडासाठी बोली लावली जाते. 2019 मध्ये एका ब्लॅक वॉटरमेलनची तब्बल 4.5 लाख रुपयांना विक्री झाली होती. हे एक जपानी कलिंगड आहे. होकाइडो आयलंडच्या उत्तर भागात या कलिंगडाचे उत्पादन होते. जपान हे कलिंगड अन्य देशांना निर्यातदेखील करते.

Back to top button