पिंपरीतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरूच; एकूण 46 होर्डिंग जमीनदोस्त | पुढारी

पिंपरीतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरूच; एकूण 46 होर्डिंग जमीनदोस्त

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहिम सुरू आहे. आतापर्यंत एकूण 46 होर्डिंग पाडण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग उभे करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे.

किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला. तर, 3 जण जखमी झाले. त्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. रविवार (दि.23) पर्यंत 37 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. आज सोमवारी (दि.24) 7 अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले. लांडेवाडी, इंद्रायणीनगर, भोसरी, पुनावळे रस्ता, ताथवडे, विनोदे वस्ती, पिंपरी चौक, डुडुळगाव, मुंबई-बंगळुरू महामार्ग येथील हे होर्डिंग आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात एकूण 72 अनधिकृत होर्डिंग आहेत. उर्वरित अनधिकृत होर्डिंगही लवकरच तोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, राजू पवार, रवींद्र भूमकर, विठ्ठल बनसोडे, मंगल गवारे, निखिल कस्पटे (दोन होर्डिंग), साहेबराव जाधव, विनोदे हॉस्पिटॅलिटी, विनायक कलाटे, बिग इंडिया ग्रुप (पाच होर्डिंग), प्रमोद बोराटे, रावसाहेब रोकडे, आनंद पब्लिसिटी, मार्कस अ‍ॅडव्हर-बागर, सागर गायकवाड, जी फोर्स अ‍ॅडर्व्टायझिंग, कुणाल लांडगे, विशाल लांडगे, दीपक भोंडवे, लोढा, आयकॉन अ‍ॅडव्हर-दुधाने, एमआयडीसी (सहा होर्डिंग), लंके बिरजे असोसिएटर्स कंट्रक्शन, संपदा रिअलिटी, ओमकर वहिले, सद्गगुरू डेव्हलपर्स, नीलेश कलाटे, स्पेक्ट्रम बिल्डर्स, मोरया एंटरप्रायझेस (दोन होर्डिंग), शिरीष लोढा, लंके बिरजे, पठारे, ऑस्टीन, आरजीएस रिअ‍ॅलिटी, धीरेंद्र आणि ज्ञानेश्वर वाळके या जाहिरात संस्थेचे हे अनधिकृत 46 होर्डिंग आहेत.

अनधिकृत होर्डिंग स्वत:हून काढून घेण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तीन दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत शनिवारी (दि. 22) संपली आहे. अनधिकृत होर्डिंग न काढल्याबद्दल त्या होर्डिंग मालक व चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे.

गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू
अनधिकृत होर्डिंग स्वत:हून काढून घेण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी 3 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्या मुुदतीमध्ये काही होर्डिंग मालक व चालकांनी ते काढून घेतले नाहीत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

न्यायालयात किवळे दुर्घटनेची माहिती सादर
किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, 3 जण जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी (दि.17) घडली. शहरातील 434 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक होर्डिंग हे किवळेचे होते. दुर्घटनेनंतर याची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button