नाशिक : बालविवाहांची जबाबदारी निश्चित होऊन कारवाई होणार | पुढारी

नाशिक : बालविवाहांची जबाबदारी निश्चित होऊन कारवाई होणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बालविवाहाची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. बागलाण तालुक्यात ज्या गावात बालविवाह होतील, तेथील सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील व तलाठ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.

येथील पंचायत समितीच्या कै. भिकन पाटील सभागृहात अक्षय तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे घेण्यात आलेल्या तालुक्यातील शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र भामरे, मनोज जाधव, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे, वंदना भामरे, शमा दंडगव्हाळ आदी उपस्थित होते. माजी आमदार चव्हाण म्हणाल्या, अनेक विवाहांना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतात. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील गावपातळीवरील महत्त्वपूर्ण घटकांनी ग्रामीण भागात होणार्‍या बालविवाहांना रोखले पाहिजे. मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने अशा सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील व प्रशासकीय अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. महिला आयोगातर्फे राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकट्या महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती केली जाते. आयोग महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्य करते. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. बैठकीस विस्तार अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, बी. एन. ठोके आदींसह ग्रामसेवक, सर्व अंगणवाडी व आशासेविका उपस्थित होत्या. सी. बी. अहिरे यांनी आभार मानले.

ग्राम बालसंरक्षक समिती सक्रिय
बागलाण तालुक्यात यापुढे एकही बालविवाह होणार नाही, हा संकल्प आम्ही सर्वांनी केल्याचे ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात योगिता राऊत यांनी, बालविवाह झाल्यास अल्पवयीन मुलींचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही. त्या लवकर माता झाल्यास होणारे बाळ कुपोषित होते. नातेसंबंध आणि कुटुंब कसे चालवायचे याबाबतही त्या अज्ञानी राहून त्यांचा विकास खुंटतो, असे सांगितले. गावोगावी असलेल्या ग्राम बालसंरक्षक समितीद्वारे बालविवाह रोखण्यास एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा:

Back to top button