लग्न केल्याचा पश्चाताप होतोय; मग लग्नाला दुसरी संधी का देत नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा घटस्फोटाची मागणी करणाऱ्या दाम्‍पत्‍याला सल्ला | पुढारी

लग्न केल्याचा पश्चाताप होतोय; मग लग्नाला दुसरी संधी का देत नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा घटस्फोटाची मागणी करणाऱ्या दाम्‍पत्‍याला सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘तुम्‍ही दोघेही बंगळूरमध्‍ये सॉफ्‍टवेअर इंजिनिअर आहात. पत्‍नी दिवसा ऑफीसला जाते तर पती रात्री ड्युटीला जातो. तुम्‍हाला लग्‍न करण्‍यासाठी वेळ कुठे मिळाला, तुम्‍हाला लग्‍न केल्‍याचा पश्चाताप होतोय का,असे सवाल करत लग्‍नाला दुसरी संधी का देत नाही, असा सल्‍ला घटस्फोटाची मागणी करणाऱ्या दाम्‍पत्‍याला सल्ला सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.

दाम्‍पत्‍याच्‍या याचिकेवर न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, “तुमच्या दोघांकडे लग्नासाठी वेळ कुठे आहे. तुम्ही दोघे बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहात. एक दिवसा कामावर जातो आणि दुसरा रात्री. तुम्हाला घटस्फोटाबद्दल पश्‍चाताप नाही; पण लग्नाबद्दल पश्चात्ताप होतोय का, असा सवाल करत लग्नाला दुसरी संधी का देत नाही.”

पती-पत्नी दोघांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, संबधित याचिका प्रलंबित होती. यावेळी दाम्‍पत्‍यामध्‍ये तडजोड  होण्याची शक्यता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राकडे पाठविण्यात आले होते. दोघांनीही समझोता करारास सहमती दर्शविली आहे. काही अटी व शर्तींवर हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ ब अंतर्गत परस्पर संमतीने घटस्फोटाच्या घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. पत्नीच्या सर्व आर्थिक दाव्यांच्या पूर्ण आणि अंतिम निकालासाठी पतीने कायमस्वरूपी पोटगी म्हणून एकूण १२ लाख ५१ हजार रुपये देणार आहे.

दाम्‍पत्‍याला घटस्‍फोट मंजूर

या प्रकरणात खंडपीठाने १८ एप्रिल रोजी दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला होता. निकाल देताना खंडपीठाने म्‍हटलं होतं की, या परिस्थितीचा विचार करून आम्ही घटनेच्या कलम १४२ अन्वये दाखल केलेला अर्ज तडजोडीसह रेकॉर्डवर घेतला आहे. करारातील अटी वैध आहेत. दोन्ही कराराच्या अटी मान्य करण्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद आणि अर्ज जाणून घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने, घटनेच्या कलम १४२ अन्वये आपल्या अधिकाराचा वापर करून, हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ ब अंतर्गत परस्पर संमतीने घटस्फोटाच्या हुकुमाद्वारे दोघांना घटस्फोट मंजूर केला. तसेच हुंडा बंदी कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि इतर संबंधित बाबी अंतर्गत राजस्थान आणि लखनौ येथे पती-पत्नीने दाखल केलेल्या विविध कार्यवाही रद्द केल्या.

हेही वाचा : 

Back to top button