नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी | पुढारी

नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला एसटी धावणार आहे. त्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांकडून नेहमीच पसंती मिळत असते. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात एसटीला नेहमीच प्रवाशांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी बघावयास मिळते. उन्हाळी सुटीत प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १५ एप्रिलपासून जादा बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या या निर्णयामुळे लहान मुलांना मामाच्या गावाला तर जाता येईलच, पण पर्यटनाचाही आनंद लुटता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातून खानदेशसह प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर जादा बसेस धावणार आहेत. तसेच नाशिक-कसारा मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उंबरमाळी रेल्वेस्थानक ते नाशिक अशी नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सटाणा ते कल्याण फेरीही प्रवाशांच्या मागणीनुसार नव्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सातपूरला प्रवाशांची चढ-उतार होणार

सातपूर बसस्थानक १० एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथून विविध मार्गांवर सुटणाऱ्या व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या सर्व फेऱ्या सातपूर बसस्थानकातूनच होणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार केली जाणार असून, सातपूर परिसरातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button