Nashik : वणी-पिंपळगाव रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचारी ठार | पुढारी

Nashik : वणी-पिंपळगाव रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वणी-पिंपळगाव रस्त्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास साईबाबा मंदिरासमोर पादचाऱ्याला वाहनाने उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

वणीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेने जात असलेले शरद चिंधु बोंबले (वय ३७, रा. धोंडगव्हाणवाडी, ता. चांदवड) यांना पाठीमागून आलेल्या जोरदार वाहनाने जोरात धडक दिली. शरद बोंबले १० ते १२ फूट वर उडून रस्त्यावर पडले, असे घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर मोरे यांनी तपासले असता ते मृत झाल्याचे सांगितले. मृत शरद हे आपल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी जवळील कांदाचाळीकडे चालले होते. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

वणी-पिंपळगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, या रस्त्यावर अपघाताची मालिकाच सुरू आहे. चार दिवसांपूर्वी सख्खे भाऊ-बहीण रस्त्याच्या बाजूला उभे असताना त्यांना भरधाव पिकअपने उडविले होते. या रस्त्यावरील बहुतांश अपघात पिकअप वाहनांमुळे झालेले आहेत. बरेच ट्रॅक्टरचे चालक पिकअप चालवताना आढळून येत आहे. वणी पोलिसांनी पिकअप चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button