एकाकी ज्येष्ठ होत आहेत ‘टेक्नोसॅव्ही’; एकटे जगताना होतोय ऑनलाइन माध्यमांचा उपयोग | पुढारी

एकाकी ज्येष्ठ होत आहेत ‘टेक्नोसॅव्ही’; एकटे जगताना होतोय ऑनलाइन माध्यमांचा उपयोग

पुणे : पत्नीचे पाच ते सहा वर्षांपूर्वी निधन झाले आणि आयुष्यात एकटेपण आले. परंतु एकाकीपणातही फेस्कॉममार्फत दिलेल्या सोशल मीडिया प्रशिक्षणामुळे मी घरबसल्या वीज बिल भरण्यापासून ते बँकेच्या व्यवहारापर्यंतचे अनेक व्यवहार ऑनलाइन करीत असून, त्यामुळे एकटेपण दूर होण्यास मदत झाली आहे, असे ज्येष्ठ नागरिक अनिल देशपांडे सांगत होते.

एकाकी आयुष्य जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या पुण्यात अंदाजे 8 हजार हून अधिक आहे. सध्या मुले परदेशात असल्यामुळे, पती-पत्नीच्या निधनामुळे, अविवाहित असल्यामुळे आणि आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगावे लागत आहे. पुण्यात कोथरूड, कर्वेनगर, वारजे-माळवाडी, औंध परिसर, बाणेर, शिवाजीनगर अशा विविध ठिकाणी एकटे राहणारे ज्येष्ठ राहतात.

अशा ज्येष्ठांना मदतीचा हात दिलाय तो महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाने (फेस्कॉम) संघाकडून ज्येष्ठांना सोशल मीडिया कसे वापरावे याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आता 60 ते 85 वयोगटातील ज्येष्ठ कुशलतेने घरबसल्या सोशल मीडियाचा वापर करू लागले आहेत.
बँकेचे व्यवहार, वीज बिल भरणे, महिन्याचा किराणा ऑनलाइन ऑर्डर करण्यासह काहीजण फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रिल्सही बनवत आहेत. तर काहीजण ऑनलाइन संगीत, नृत्य, वादनाचे धडे गिरवत आहेत. तर काहींनी परदेशी राहणार्‍या मुलांशी व्हिडिओ कॉल संपर्क सुरू केला आहे. एकटे राहताना येणार्‍या अडचणींना दूर सारत एकटे राहणारे ज्येष्ठही डिजिटल साक्षर बनले आहेत.

एकाकी ज्येष्ठांच्या मदतीसाठी फेस्कॉमने नेहमीच विविध उपक्रम राबविले आहेत. आता काही ज्येष्ठ नागरिक केअर गिव्हर्स बनून एकाकी ज्येष्ठांना आरोग्य सुविधा पुरविण्यापासून ते दैनंदिन व्यवहारापर्यंतचे…सर्व सहकार्य करत आहेत. पुण्यात अ‍ॅस्कॉपचे का. बा .कुलकर्णी, बंडोपंत फडके, बाळासाहेब कुलकर्णी, फेस्कॉमचे चंद्रकांत महामुनी व त्यांची टीम अशा ज्येष्ठांना मदत करण्यास तयार असतात. तर यासोबतच आम्ही एकाकी ज्येष्ठांना सोशल मीडियाचे प्रशिक्षणही दिले असून, दैनंदिन व्यवहारात एकटे राहताना महत्त्वांच्या कामांसाठी आणि करमणुकीसाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरू केला आहे.

                                               – अरुण रोडे, फेस्कॉमचे अध्यक्ष

Back to top button