नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगले आहे. त्यांच्या सरकारच्या कामाचा परिणाम कोट्यवधी लोकांच्या जीवनावर होतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर न्यायालय प्रश्न विचारते त्यावर पंतप्रधान मौन बाळगतात किंवा लक्ष विचलित करतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एक इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. या लेखात त्यांनी महटले आहे की, केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील लोकशाहीचे तीनही स्तंभ पद्धतशीरपणे मोडून काढले आहेत, नुकत्याच झालेल्या संसदेचे अधिवेशनात देशातील बेरोजगारी, महागाई, अर्थसंकल्प, अदानी घोटाळा, सामाजिक विभाजन असे मुद्दे उपस्थित करण्यापासून विरोधकांना रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मंजूर करण्यासाठी सरकारने लोकांचे लक्ष वळवण्यासाठी असे अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे जनतेच्या पैशांचा ४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.
वित्त विधेयक लोकसभेतून मंजूर झाले तेव्हा पंतप्रधान त्यांच्या मतदारसंघातील प्रकल्पांच्या उद्घाटनात व्यस्त होते. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बेरोजगारी किंवा महागाईचा उल्लेखही केला नाही. जणू या समस्या अस्तित्वातच नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
'सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे' या विरोधकांनी केलेल्या आरोपाबाबतही सोनिया गांधी बोलल्या. ९५ टक्क्यांहून अधिक राजकीय गुन्हे फक्त विरोधी पक्षांवरच नोंदवले गेले आहेत. त्याचवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्यांवरील सर्व आरोप अचानक गायब झाले. त्याचवेळी त्यांना धमकावून सरकारने माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.
सरकार न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनिया गांधी यांनी या लेखात म्हटलं आहे की, भाजप आणि आरएसएस नेत्यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत, असा आरोपही त्यांनी केला. येणारे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी हातमिळवणी करून भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी या लेखात नमूद केले आहे.
हेही वाचा :