नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे, दोघांना अटक | पुढारी

नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे, दोघांना अटक

नाशिक  (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

वडनेरभैरव येथे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करत दारू बनवण्याच्या रसायनासह ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

सध्या वडनेरभैरवचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरीचा यात्रोत्सव सुरू ेआहे. यात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पाेलिसांनी अवैध दारू अड्डयांवर छापेमारीचे सत्र अवलंबले आहे. यात वडारगल्ली येथील अड्ड्यावर धाड टाकून ४० हजारांचे प्रत्येकी २०० लिटर मापाचे एकूण ४ निळे ड्रम, त्यात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे रसायन असे एकूण ८०० लिटर रसायन, १० हजार रुपये किमतीचा २०० लिटरचा ड्रम त्या १०० लिटर गावठी दारू असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संशयित कल्पना अर्जुन जाधव (५५, वडारवाडी) यांना अटक केली. तर वडारवाडी, वरचा कोळीवाडा येथे एका टाकीत ६ हजार ५०० रुपये किमतीची २०० लिटरचा लोखंडी ड्रम त्यात गावठी दारू तयार करण्याचे १३० लिटरचे रसायन, २ हजार किमतीची २० लिटरचा कॅन, त्यात 20 लिटर गावठी दारू असा एकूण ८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच संशयित कैलास शंकर जाधव यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल व दोघांविरोधात बेकायदा, विनापरवाना दारूविक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, रमेश आवारे, पोलिस नाईक वाघमारे, कर्डे, जाधव, भुसाळ, होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे, रमेश तिडके, नितीन राऊत यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button