

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 18 जागांसाठी तब्बल 301 अर्ज प्राप्त झाले आहेत. चार गटांमध्ये हे अर्ज प्राप्त झाले असून, पाच एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. उमेदवारी अर्ज विक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 542 अर्जांची विक्री झाली. त्यांपैकी 301 अर्ज निवडणूक अधिकार्यांकडे सादर करण्यात आले.
यामध्ये, सेवा सहकारी संस्था मतदारसंघात अकरा जागांसाठी 165 अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी 70 अर्ज, आडते/व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी 40, तर हमाल/मापाडी मतदारसंघाच्या एका जागेसाठी 26 अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करण्यात आले. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, 20 एप्रिलपर्यंत उमेदवाराला अर्ज माघारी घेता येणार आहेत. 21 एप्रिल रोजी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर, उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
विकास सोसायटी सर्वसाधारण गटातून प्रकाश जगताप, शेखर म्हस्के, रामदास चौधरी, गौरव म्हस्के, राजेंद्र कोंडे, महेंद्र पठारे, हेमंत पारगे, भारती शेवाळे; तर ग्रामपंचायत मतदारसंघातून शुक्राचार्य वांजळे, राजेंद्र कांचन, दिलीप वाल्हेकर, बाबाजी कांबळे तसेच अडते-व्यापारी मतदारसंघातून सौरभ कुंजीर, अशोक गावडे, मारुती चौधरी, अमोल घुले, अनिरुध्द भोसले आदींसह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे पॅनेल गुरुवारी जाहीर होणार
दरम्यान, पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा होऊन येत्या गुरुवारी (दि. 6) पॅनेल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हे पॅनेल राष्ट्रवादीचे होणार की महाविकास आघाडीचे, याबाबतचे चित्र त्याच दिवशी स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात आले.