तांबे-थोरातांना दिलेल्या वागणुकीचा निषेध ; नाशिकमध्ये कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे | पुढारी

तांबे-थोरातांना दिलेल्या वागणुकीचा निषेध ; नाशिकमध्ये कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर निवडणूकीत काॅग्रेसकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांना देण्यात अलेल्या वागणूकीच्या निषेधार्थ पेठमधील पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. ११) त्यांच्या पदाचे व पक्ष सदस्यत्वाचे सामुहिक राजीनामे दिले. या राजीनामास्त्रामुळे कॉग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणूकीत माजीमंत्री थोरात यांच्यासह तांबे पिता-पुत्रांना कॉग्रेसकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याची भावना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे. नवनिर्वाचित आ. तांबे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक काळात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. त्यावेळी तांबे यांनी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागताना पक्षाच्या प्रदेशस्तरावरून चुकीचे एबी फॉर्म दिल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी उघडउघडपणे नाराजीचा सूर आळवला आहे. त्यामुळे कॉग्रेसमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

कॉग्रेसमधील नाराजीचा हा सूर आता तालूकास्तरावर पोहचला आहे. पेठमधील पक्षाच्या तालूकाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी थोरात व तांबे यांना पक्षाकडून मिळालेल्या वागणूकीच्या निषेधार्थ सामुहिक राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे यांना सादर केले आहे. तसेच डिजिटल नोंदणी केलेले सर्व बूथ विसर्जित केल्याचे ही राजीनामा पत्रात नमुद केले आहे. या सामुहिक राजीनाम्यांमुळे सर्वत्र एकच खळबळ ऊडाली आहे. सामुहिक राजीनाम्यावर कॉग्रेस काय भुमिका घेणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अखेरचा ‘पंजा’ची चर्चा

पेठमधून राजीनामे देणाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष विशाल जाधव यांच्यासह संदीप भोये, हरिदास भुसारे, ललित मानभाव, कुमार भोंडवे, राहुल चौधरी, विकास सातपुते, दिनेश भोये, कैलास गाडर, रुक्मिणी गाडर, गिता जाधव, रेखा भोये आदींचा समावेश आहे. दरम्यान, या पदाधिकाऱ्यांनी सोशल माध्यमातून राजीनाम्याबद्दल माहिती व्हायरल केली आहे. त्यात अखेरचा शब्द लिहून त्यापुढे पंजाचे इमोजी ठेवले आहे. त्यामूळे या इमोजीची सर्वत्र चर्चा होेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button