पुणे: नामांकित फायनान्स कंपनीला मॅनेजरने घातला 31 लाखांचा गंडा, ग्राहकांच्या हवाली केल्या बनावट पावत्या | पुढारी

पुणे: नामांकित फायनान्स कंपनीला मॅनेजरने घातला 31 लाखांचा गंडा, ग्राहकांच्या हवाली केल्या बनावट पावत्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एका नामांकित फायनान्स कंपनीत कलेक्शन मॅनेजर म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीने कंपनीची 31 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना बनावट पावत्या हवाली केल्यानंतर जमा झालेली रक्कम कंपनीच्या खात्यावर न भरता ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी, निलेश वावरे (वय37,रा. विश्रांतवाडी विमानतळरोड) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रफुल्ल चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुन 2022 ते 21 जानेवारी 2023 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी येथे ही नामांकित फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी हा या कंपनीत कलेक्शन मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने ग्राहकांकडून वेळोवेळी थकीत कर्जाचा हप्ता व कर्ज प्रकरणे बंद करण्यासाठी विविध ग्राहकांकडून 31 लाख 34 हजार 993 रुपये घेतले. ग्राहकांना पैसे भरल्याचा विश्वास वाटावा म्हणून त्याने कंपनीच्या बनावट पावत्या त्यांच्या हवाली केल्या. त्यानंतर कंपनीत जमा झालेली ही रोकड खात्यावर न भरता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भांडवलकर करीत आहेत.

Back to top button