गिरणा नदीला येणार हंगामातील पहिला पूर; धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग | पुढारी

गिरणा नदीला येणार हंगामातील पहिला पूर; धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून समुहातील धरण भरल्याने त्यातून विसर्ग वाढला आहे. चणकापूर व पुनद धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने उद्या (दि. २९) पहाटे ठेंगोडा बंधाऱ्यावरुन तब्बल १२ हजारहून अधिक क्यूसेक वेगाने पाणी झेपावणार आहे. तो या हंगामातील गिरणा नदीचा सर्वात मोठा पूर ठरणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४२७ दलघफू क्षमतेच्या चणकापूर धरणात ९७ टक्के, तर १३०६ दलघफू क्षमतेच्या पूनद धरणात ९८ टक्के जलसाठा मर्यादित करुन मंगळवारी रात्री ११ वाजता अनुक्रमे ८८८८ व ३८०० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठेंगोडा बंधाऱ्यावरुन सुमारे १२ हजार क्यूसेक इतका फ्लो राहण्याची शक्यता आहे. बुधवारी पहाटे २ वाजता ही परिस्थिती असेल. तेथून मालेगावातील गिरणा पुलापर्यंत हे पुराचे पाणी पहाटे पाच वाजेपर्यंत येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार सी आर राजपूत यांनी दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील महाकाय जलाशय असलेले गिरणा धरण (१८,५००दलघफू) जवळपास ८० टक्के भरले आहे. दोन दिवसांपासून पाण्याची मोठी आवक आणि आता मोठा पूर उंबरठ्यावर असल्याने यंदाही हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची चिन्हे आहेत.

ज्या परिसरात जनावरे गाई, म्हशी, मेंढ्या असतील, त्यांना गुलाबी चक्री वादळाचा पाऊस सहन न होऊन दुर्दैवाने पशुहानी होऊ शकते. तरी पशुपालकांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवावेत. गेल्या वर्षी दुर्दैवाने सप्टेंबर २०२० च्या पावसात मालेगाव तालुक्यातून साधारणतः ८००० जनावरांची हानी झाली होती. यावेळी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे.
सी आर राजपूत,
तहसीलदार मालेगाव.

Back to top button