जळगाव महापालिकेत २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी | पुढारी

जळगाव महापालिकेत २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

निधीअभावी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याची ओरड केली जाते. महापालिकेवरील कर्जाचा डोंगर, कथित भ्रष्टाचाराबाबत नेहमीच चर्चा होतात. मात्र, महापालिकेची नागरिकांकडे तब्बल २३६ कोटी रुपये घरपट्टी थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे.

जळगाव महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. ८८ कोटी मागील थकबाकी आहे. तर १४८ कोटी या वर्षाची, अशी एकूण २३६ कोटी थकबाकी आहे. महापालिकेकडील माहितीनुसार, सहा वर्षांपर्यंत थकबाकीदार काढले आहे. त्यात एक वर्षाचे ६,६६९, दोन वर्षांचे १८,१६१२, तीन वर्षांचे ५,५७०, चार वर्षांचे ५,४६०, पाच वर्षांचे २,३३२ आणि सहा वर्षांवरील ११,१७० मिळकतधारक आहेत. घरपट्टी वसुली कमी प्रमाणात होत असल्यामुळे महापालिकेकडे निधीचा अभाव आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. ही वसुली वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम राबविण्यात येणार आहे. रक्कम न भरणार्‍या थकबाकीदारांचे नळ संयोजन बंद करणे, तसेच जप्ती करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.

वसुलीसाठी पथके नियुक्त…
थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन वसुली करण्यात येणार आहे. यासाठी अभियंत्यासह सर्व अधिकार्‍यांचे पथक नियुक्त केले आहे. याशिवाय घरबसल्या रक्कम भरण्यासाठी महापालिकेतर्फे फोन पे, गुगल पे, डेबीट, क्रेडिट कार्ड, नेट बँकीग या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button