INDvsNZ 3rd T20 : मालिकेतील निर्णायक सामन्यात ‘या’ तीन भारतीय खेळाडूंवर नजरा | पुढारी

INDvsNZ 3rd T20 : मालिकेतील निर्णायक सामन्यात ‘या’ तीन भारतीय खेळाडूंवर नजरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsNZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा निर्णय बुधवारी (1 फेब्रुवारी) होणार आहे. मालिकेत 1-1 अशी बरोबरी असताना दोन्ही संघ शेवटचा आणि निर्णायक सामना खेळण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांशी भिडतील. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. येथे सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले असून त्या सर्वांमध्ये भारतीय संघ सहभागी झाला आहे. यातील चार सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

टॉप ऑर्डरला चांगली सुरुवात करावी लागेल

बुधवारच्या सामन्यानंतर भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून बराच काळ दूर राहिल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी छाप पाडण्याची युवा खेळाडूंना शेवटची संधी आहे. या टी-20 मालिकेत भारतीय टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. सलामीवीर शुभमन गिल, ईशान किशन चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले आहेत. बांगलादेशात द्विशतक झळकवणा-या इशानची लय बिघडल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे वन-डेमध्ये चमकदार कामगिरी करणारा गिलची टी-20 मध्ये फिरकी गोलंदाजीचा सामना करताना भांबेरी उडत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिस-या क्रमांकावर संधी देण्यात आलेल्या राहुल त्रिपाठीलाही त्याच्या क्षमतेनुसार प्रदर्शन करता आलेले नाही. अशा स्थितीत तिसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा असेल, तर आघाडीच्या फळीतील फलंदाजांना दमदार कामगिरी दाखवावी लागेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 15 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. ईशान, गिल आणि त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिसरी विकेट 50 धावांवर पडली. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात या चुकीची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे आहे, अन्यथा मालिका गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. (INDvsNZ 3rd T20)

पृथ्वी शॉला संधी मिळायला हवी

आतापर्यंत शुभमन गिलने 5 आणि राहुल त्रिपाठीने 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत अर्धशतकही ठोकलेले नाही. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्याने दोघांपैकी एकाला वगळून संधीची वाट पाहणाऱ्या पृथ्वी शॉला स्थान देणे आवश्यक आहे. तो टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना आसामविरुद्धच्या सामन्यात 383 चेंडूत 379 धावांची खेळी साकारली होती. पृथ्वीने या खेळीत 4 षटकार आणि 49 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही 98.96 होता. या खेळीनंतरच तो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. या खेळीच्या जोरावर आणि ऋतुराज गायकवाड बाहेर पडल्याने पृथ्वीला टीम इंडियात स्थान मिळाले.

मावीच्या जागी उमरान

वेगवान गोलंदाज शिवम मावीने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खास कामगिरी केलेली नाही. पहिल्या सामन्यात त्याला 2 षटके गोलंदाजी मिळाली, ज्यात त्याने 19 धावांत एक विकेट घेतली. तर दुसऱ्या सामन्यात मावीला केवळ एकच षटक गोलंदाजी करता आली. यामध्ये त्याने 11 धावा दिल्या. त्याची विकेटची पाटी कोरी राहिली. दुसरीकडे उमरानने पहिल्या सामन्यात एका षटकात 16 धावा दिल्या होत्या. पण त्याआधीच्या तीन वनडेत त्याने 6 विकेट घेतल्या होत्या. अनेक दिग्गज आणि भारतीय संघ व्यवस्थापन उमरानला संघातील लंबी रेस का घोडा मानत आहेत. असे असेल तर त्याला पूर्ण संधी मिळायला हवी. त्यामुळे मावीच्या जागी उमरानला संधी द्यायला हवी, असे माजी खेळाडूंचे म्हणणे आहे. (INDvsNZ 3rd T20)

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आकडेवारी…

1. सर्वोच्च सांघिक धावसंख्या : टीम इंडियाने 20 मार्च 2021 रोजी इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात येथे 2 गडी गमावून 224 धावा केल्या.

2. सर्वात कमी सांघिक धावसंख्या : 12 मार्च 2021 रोजी झालेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघ येथे इंग्लंडविरुद्ध केवळ 7 बाद 124 धावाच करू शकला.

3. सर्वात मोठा विजय : 12 मार्च 2021 रोजी, इंग्लंडने भारताचा टी-20 सामन्यात 27 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून पराभव केला.

4. सर्वाधिक धावा : विराट कोहलीने 6 डावात 86 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत.

5. सर्वात मोठी खेळी : या मैदानावर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने 52 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली आहे.

6. सर्वाधिक षटकार : येथेही जोस बटलर पुढे आहे. त्याने 5 डावात 10 षटकार ठोकले आहेत.

7. सर्वाधिक बळी : हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर आहे. या वेगवान गोलंदाजाने 5 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

8. सर्वोत्तम गोलंदाजी : इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 18 मार्च 2021 रोजी झालेल्या सामन्यात भारताविरुद्ध 4 षटकात 33 धावा देऊन 4 बळी घेतले.

9. सर्वात मोठी भागीदारी : 20 मार्च 2021 रोजी भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली होती.

10. सर्वाधिक सामने : भुवनेश्वर कुमार आणि विराट कोहली यांनी या मैदानावर सर्वाधिक सामने खेळले आहेत. दोन्ही खेळाडू येथे झालेल्या सर्व 6 सामन्यांमध्ये खेळले आहेत.

टी-20 मालिकेसाठी भारत आणि न्यूझीलंडचे संघ :

भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपली, ईश सोधी, ब्लेअर टिकनर

Back to top button