नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने | पुढारी

नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासणारे शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे या निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे.

नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जानेवारी) सायंकाळी निदर्शने करीत घोषणा दिल्या. भारतीय जनता पार्टी सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असल्याचे अनेक दिवसापासून चित्र रंगवले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याने तसा खुलासा केलेला नाही तरी मात्र सत्यजित तांबे भाजपा पुरस्कृत उमेदवार असल्याचा समज सर्व दूर आहे. असे असताना स्वतः सत्यजित तांबे हे नंदुरबार जिल्ह्यात आले असताना त्यांनी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणे टाळले. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते व विद्यमान स्थितीत बाळासाहेब शिवसेनेचे प्रमुख नेते बनलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समवेत जाहीर मेळावा त्यांनी घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर घोषणा देत केलेली निदर्शने राजकीय तरंग उठवणारी ठरली आहेत.

“भाजपच्या वरिष्ठांनी पाठिंबा देण्याचा आदेश दिला तरीही त्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे या भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला महागाई विरोधाच्या आंदोलना प्रसंगी काळे फसले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नागरिकाचा सन्मान करता येत नाही त्याला भाजपाने पाठिंबा देऊ नये आणि पक्षाने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत, असा इशारा नंदुरबार मधील भाजपा पदाधिकारी तथा नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी दिला आहे. लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण मतदारांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निदर्शने केले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी त्यांच्या हातात सत्यजित तांबे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासत असतांनाचे बॅनर होते. पदवीधर मतदारसंघाचा प्रचार संपत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवमानाविषयीची भावना तांबे यांच्या विरोधात जोर धरत असून भाजपा समर्थकांचा तांबे यांना कितपत लाभ होतो यावर प्रश्नचिन्ह लावणारी आहे.

हेही वाचा : 

Back to top button