नाशिक : मखमलाबाद खुनाचा उलगडा, दोन अल्पवयीन मुलांनी ‘या’ कारणावरुन केला खून | पुढारी

नाशिक : मखमलाबाद खुनाचा उलगडा, दोन अल्पवयीन मुलांनी 'या' कारणावरुन केला खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थ नगर जवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. सातपूर) याच्या खुनातील संशयितांना शोधण्यात पंचवटी पोलीसांना यश आले असून, यातील दोन्ही संशयित अल्पवयीन असून, ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

शनिवारी(दि २०) सकाळी ही खुनाची घटना उघडकीस आली होती. मात्र मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. पाेलिसांनी केलेल्या मिसिंग नोंदींच्या तपासात मृतदेह सातपूर येथील ऋषिकेश भालेराव या बेपत्ता व्यक्तीचा असल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटविली. यांनतर गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत या विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.

ऋषिकेश हा रात्री सातपूर येथून जात असताना त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना अशोक स्तंभापर्यंत लिफ्ट मागितली. तेथे पोहोचल्यानंतर त्याने संशयितांना मखमलाबाद रोड येथे सोडण्याची विनंती केली. त्यावरून त्या दोघांनी समर्थ नगर येथे त्याला सोडले. गाडीवरून उतरल्यानंतर ऋषिकेशने दोन्ही संशयितांकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. यावरून त्या तिघांमध्ये वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात संशयितांनी ऋषिकेशला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातल्याने यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर तेथून फरार होत संशयितांनी थेट मुंबई गाठली. या क्लिष्ट गुन्ह्याचा पंचवटी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत छडा लावला. दरम्यान, पत्रकार परिषदेत या तपासाची माहिती देताना पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे, पोलिस निरीक्षक गुन्हे युवराज पत्की आदींसह गुन्हे शाखा युनिट एक व दाेन तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे आधिकारी उपस्थित होते.

…यांनी बजावली कामगिरी

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, दिनेश खैरनार, रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, हवालदार सागर कुलकर्णी, नाईक अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, दीपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, राकेश शिंदे, यतीन पवार, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे, नितीन जगताप, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पवार, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, राहुल लभडे, कल्पेश जाधव, वैभव परदेशी, अंकुश काळे, योगेश शिंदे, कैलास महाले, नारायण गवळी, युवराज गायकवाड यांनी कामगिरी बजावली.

खबऱ्यांचे नेटवर्क मदतीला
नाशिक शहर पोलिसांना वाढते गुन्हेगारीला आळा घालायचा असल्यास गोपनीय बातमीदाराची म्हणजेच खबरीची मदत लागते. यापूर्वीच्या काळात खबरींचे नेटवर्क वापरून अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याची उदाहरणे आहेत. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घडलेला गुन्हा हा क्लिष्ट स्वरूपाचा होता. मयताचे राहते ठिकाण ते खुनाचे ठिकाण जवळपास १५ किलो मीटरचे अंतर होते. या गुन्ह्यातील संशयितांपर्यंत पोहचणे तसे फार अवघड होते. तरी देखील खबऱ्यांचे नेटवर्क वापरत या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा करीत मुंबईकडे फरार झालेल्या विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा :

Back to top button