IT नंतर आता ऑटो क्षेत्रात नोकरकपात! Ford कडून ३,२०० कर्मचाऱ्यांना नारळ | पुढारी

IT नंतर आता ऑटो क्षेत्रात नोकरकपात! Ford कडून ३,२०० कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : फोर्ड मोटर कंपनी (Ford Motor Company) संपूर्ण युरोपमध्ये ३,२०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. तसेच ही कंपनी काही उत्पादन विकासाची कामे अमेरिकेत हलवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, जर्मनीच्या IG मेटल युनियनने म्हटले आहे की, फोर्ड मोटर कंपनीने नोकरकपात केल्यास संपूर्ण युरोप खंडात कार निर्मितीच्या कामात व्यत्यय येईल आणि याविरोधात लढा दिला जाईल. IG Metall ही जर्मनीतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संघटना आहे. ही जर्मनीसह संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून ओळखली जाते.

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी मटेरिअलच्या वाढत्या किमती तसेच अमेरिका आणि युरोपियन अर्थव्यवस्थांमधील आर्थिक मंदीमुळे वाहन उत्पादकांवर खर्च कमी करण्यासाठी दबाव वाढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टेस्ला इंकच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीमुळे हा दबाव आणखीच वाढला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. फोर्ड कंपनीला उत्पादन विकास विभागातील २,५०० जणांना आणि प्रशासकीय काम पाहणाऱ्या ७०० जणांना कामावरुन कमी करायचे आहे. या नोकरकपाचीचा सर्वाधिक फटका जर्मनीत बसणार आहे, असे IG Metall ने म्हटले आहे.

फोर्ड मोटर कंपनी ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी आहे. याचे मुख्यालय अमेरिकेतील डिअरबॉर्न, मिशिगन येथे आहे. या कंपनीच्या जर्मनीतील कोलोन येथील प्रकल्पात १४ हजार लोक काम करतात. फोर्डच्या जर्मनीतील प्रवक्त्याने शुक्रवारी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत नोकरकपातीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) उत्पादनाकडे वळण्यासाठी संरचनात्मक बदल आवश्यक आहेत आणि जोपर्यंत योजनांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यावर काही बोलू शकत नाही.

मिशिगनमधील फोर्डच्या मुख्यालयातील प्रवक्त्याने सांगितले की जर्मन वर्क कौन्सिलशी चर्चा सुरू आहे आणि EV वाहन निर्मिती करताना कंपनीने अधिक स्पर्धात्मक होणे आवश्यक आहे. फोर्डने गेल्या वर्षी त्याच्या कोलोन प्लांटमध्ये सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल बनवण्यासाठी २ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली होती. या प्लांटमध्ये सध्या फोर्ड फिएस्टा तसेच इंजिन आणि ट्रान्समिशनचे उत्पादन घेतले जाते.
फोर्ड (Ford Motor Company) ही युरोपमध्ये सुमारे ४५ हजार लोकांना रोजगार देणारी दिग्गज कार निर्माता कंपनी आहे. युरोपमध्ये सात नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स तयार करण्याची कंपनीची योजना आहे. त्यात जर्मनीमध्ये बॅटरी असेंब्ली साइट असेल आणि तुर्कस्तानमध्ये निकेल सेल उत्पादन घेण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button