नाशिक : आम्ही अभ्यास करायचा कधी? संतप्त विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस | पुढारी

नाशिक : आम्ही अभ्यास करायचा कधी? संतप्त विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा तोंडावर असतानाच शाळा सुटल्यानंतर दररोजच वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होतो. महामार्गावर उतरून पायी घरी जावे लागते. घरी जाण्यासाठी रात्रीचे नऊ वाजतात. त्यामुळे आम्ही अभ्यास कधी करायचा, असा संतप्त सवाल उपस्थित करीत नाशिक-इगतपुरी मार्गावरील गावांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.२६) सायंकाळी जुने सीबीएस बसस्थानक परिसरात बसेस आडवत आंदोलन केले.

नाशिक-इगतपुरी मार्गावरील अनेक गावांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शहरात ये-जा करतात. विशेषत: रायगडनगर, वाडीवऱ्हे, विल्होळी, मुंढेगाव, सामुंडी, शिरसगाव आदी गावातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून दररोज ये-जा करत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये महामंडळाने कपात केल्याने विदयार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शुक्रवार (दि.२३) पासून मालेगाव येथील धार्मिक कार्यक्रमासाठी २० जादा बसेस सोडल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सोमवारी (दि.२६) दुपारी साडेतीननंतर नाशिक-इगतपुरी मार्गावर बस न धावल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर जुने बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. अडीच तासांपेक्षा जास्त काळ ताटकळावे लागल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी बसस्थानकाबाहेर जाणाऱ्या बसगाड्या अडविल्या. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर महामंडळाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर तेही निरूत्तर झाल्याचे बघावयास मिळाले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केल्यानंतर एसटी महामंडळाला जाग आली. एसटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले. इतर मार्गावरील बसगाड्या नाशिक-इगतपुरी मार्गाद्वारे सोडून विद्यार्थ्यांचा रोष कमी केला.

अडीच तासाने आली लालपरी
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर इगतपुरीसाठी तब्बल अडीच तासानंतर जुने बसस्थानकांमध्ये लालपरी दाखल झाली होती. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली. काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून आत जात जागा मिळविली. तर काही विद्यार्थ्यांनी चालकांच्या दरवाजातून आत प्रवेश करत जागा पटकविली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

मालेगाव येथील धार्मिक कार्यक्रमासाठी जादा बसेस सोडल्यानंतर बसफेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक-इगतपुरी मार्गावरील गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. इतरत्र मार्गावरील लालपरी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. यापुढे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
-अरूण सिया, विभागीय नियंत्रक
एसटी महामंडळ, नाशिक

हेही वाचा :

Back to top button