नेवासा : मोकाट जनावरे गो-शाळेत; नगरपंचायतीच्या उपक्रमाचे नेवासेकरांकडून कौतुक | पुढारी

नेवासा : मोकाट जनावरे गो-शाळेत; नगरपंचायतीच्या उपक्रमाचे नेवासेकरांकडून कौतुक

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट फिरणार्‍या जनावरांमुळे व्यावसायिकांसह नागरिक हतबल झाले आहेत. भाजीपाला विक्रेत्यांनाही याचा प्रचंड त्रास होत होता. याबाबत नगरपंचायतीने मोकाट जनावरांच्या मालकांना सूचना दिला. मात्र, काहीच फरक पडला नाही. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांच्या आदेशाने मोकाट जनावरे पकडून गो-शाळेत पाठविल्याने नेवासकरांनी नगरपंचायतीचे कौतुक केले.
शहरात मोकाट जनावरांचा मोठा त्रास नागरिकांना होत होता.

त्यामुळे संबंधित मालकांना माध्यमांद्वारे सूचनाही देण्यात आली होती, तरीही मोकाट जनावरांच्या मालकांनी खबरदारी घेतली नाही. त्यामुळे नाईलाजाने नगरपंचायतीच्या कार्यालयीन प्रशासकिय अधिकारी रामदास म्हस्के, अभियंता निखिल नवले, प्रवीण कदम, भाऊसाहेब म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी नगरपंचायत चौकातून 2 व बाजाततळ येथून 1 अशी 3 मोकाट वासरे पथकाने पकडून कानिफनाथ बहुउद्देशिय संस्था गोधेगाव (ता. नेवासा) येथील गो-शाळेकडे संगोपनासाठी देण्यात आली.

मोकाट जनावरांच्या मालकांनी नगरपंचायत कार्यालयात संपर्क करावा, असे अहवान मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले. नगरपंचायत कर्मचारी अस्लम पठाण, ताराचंद चव्हाण, संभाजी सरोदे, नवनाथ मतकर, राजू भोडगे, राजेंद्र चौरे,बाळू भोसले, रोहित चव्हाण, अशोक सोनवणे, अजय चक्रनारायण, अरूण चव्हाण, राजेश्वर सोनवणे, परशुराम डौले, राजू चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस हवालदार तुळशीराम गिते यांचे या कामी सहकार्य मिळाले. नागरिकांसह व्यापार्‍यांना त्रास होणार नाही, म्हणून मोकाट जनावरांच्या मालकांनी खबरदारी घ्यावी अन्यथा या जनावरांना पकडून गो-शाळेत रवानगी करणार असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.

Back to top button