रस्त्यांची पुन्हा खडखड; शेवगाव तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे | पुढारी

रस्त्यांची पुन्हा खडखड; शेवगाव तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे

रमेश चौधरी

शेवगाव : रस्त्यांचा खडखड पुन्हा सुरू झाला असून, पंधराच दिवसांपूर्वी रस्त्यांची केली डागडुजी. रस्ते पुन्हा उखडायला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या प्रकाराने शासनाकडील जनतेच्या पैशाची उधळपट्टीच झाली, तर पुन्हा तेच दिवस येतील या चिंतेने प्रवाशांत संताप आहे. एक चुक वर्षांनुवर्षे शेवगावकरांना महागात पडली असल्याने पश्चाताप हाच पर्याय सध्यातरी त्यांच्यापुढे राहिला आहे. यंदाही पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास बांधकाम विभागाने घाई गडबड दाखवली.

प्रवाशांच्या संतापाने येणार्‍या तक्रारींची दखल घेऊन, त्यांना खड्डे बुजवणे गरजेचे होते. तालुक्यातील सर्वच राज्य व जिल्हा मार्ग काही वर्षांपासून खडतर झाले आहेत. बुजवाबुजवीत त्यास आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र, काही दिवसांतच हा आकार-उकार घेतो आणि नागरिकांच्या जिवांचा खेळ होतो. केवळ खराब रस्त्यांच्या संतापाची सीमा संपलेल्या लाखो नागरिकांच्या भावना संपल्या आहेत.

नेवासा, नगर, मिरी, गेवराई, पैठन राज्यमार्ग व आखेगाव, दहिगावसह इतर जिल्हा मार्ग म्हणजे ‘फुटलेली खडी अन् तुटलेले डांबर, अशा दैनिय अवस्थेचे साक्षीदार झाले आहेत. यासाठी अनेक आंदोलने झाली, सोशल मीडियावर आरोप, तर निवेदनाचा खच पडला; मात्र कोरोनाच्या कारणावर तो लोटला गेला.

दहा वर्षांपूर्वी आणि आजच्या रस्त्यात झालेला फरक पाहता अनेकांना आपल्या एका चुकीची अनुभुती येत आहे. खडखड करत धावणारी वाहणे आणि चालताना मुठीत जीव घेणारे पदचार्‍यांचा प्रवास रामभरोसे झाला आहे. दहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे शासन आहे. राज्यातही पाच वर्षे युतीचे होते आणि आता आहे. या कालावधीत अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले, त्यातून आसपासचा विकास बदलला.

मात्र, शेवगाव तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशात आला नाही. येता-येता तो बाजुला सारला तरीही लोकप्रतिनिधीने आपले राजकीय वर्चस्व पणाला लावले नाही. याचा अर्थ या तालुक्यावर त्यांची असणारी बेगडी आपुलकी दिसून येते, अशीच काहीशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी अन् विरोधक एकाच माळेचे मनी
लोकप्रतिनिधी अन् विरोधक एकाच माळेचे मनी बनलेत की, काय अशा शंका-कुशंका व्यक्त करताना शेवगाव तालुक्याचा भरकटलेला विकास, दळवळण साधनाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अंतरमनाला छेद देत आहे. नेवाशाची ज्ञानेश्वरी, पैठनची पंढरी भक्तांना केवळ रस्त्याने दूर झाली आहे. वाहनांचे नुकसान, अपघाताचे अपगंत्व आणि प्रवासात झालेले विकार हाच खरा रस्त्यांचा विकास झाला असून, सांत्वन, आशीर्वाद, सत्कार यात राजकारण गुरफटल्याने शेवगाव तालुक्यातील जनतेला कुणाकडे दाद मागवावी.

रस्ते उखडले, यास जबाबदार कोण?
एवढेच नव्हे, तर अमरापूर-सामनगावसह इतर वाजत गाजत झालेले पक्के रस्ते सहाच महिन्यांत पूर्णता: उखडले आहेत. यास जबाबदार कोण?, असा सवाल केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्त्यांच्या कामांसाठी प्रसिद्धीतून कोटींच्या आकड्यांची खैरात चालू आहे. प्रत्यक्षात दमडीचेही काम चालू असताना दिसत नाही. खड्डे बुजविने हा रस्त्यांचा विकास नाही, तर त्यावर किती खर्च झाला, हा आता संशोधनाचा विषय आहे.

Back to top button