धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय | पुढारी

धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय

धुळे, पुढारी वृत्तसेवा :

धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 10 गावातील 72 कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याबाबतची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी वेळोवळी शासनाकडे आवाज उठविला होता.

धुळे महानगरपालिकेची दि. 5 जानेवारी 2018 रोजी हद्दवाढ करण्यात आली. त्यानुसार धुळे तालुक्यातील वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, बाळापूर, मोराणे प्र.ल.,पिंप्री या गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता. मनपात समावेश होण्याआधी या गावात ग्रामपंचायत कार्यरत होती. या ग्रामपंचायतीत लिपीक, वॉटरमन, सफाई कामगार असे विविध कर्मचारी अनेक वर्षापासून काम करीत होते. मात्र या कर्मचार्‍यांना धुळे महानगरपालिकेच्या अास्थापनेवर सामावून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर बेरोजगारी बरोबर उपासमारीची वेळ आली होती. त्यांचा मनपा अस्थापनेवर समावेश करणेबाबत आ.कुणाल पाटील यांनी वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला होता.

धुळे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडेही बैठक घेवून मागणी केली होती. तसेच आ.कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन मार्च 2021 मध्ये तारांकीत प्रश्‍न क्र.20505, अर्थसंकल्पिय अधिवेशन मार्च 2021 लक्षवेधी सूचना क्र.130 आणि पावसाळी अधिवेशन जुलै 2022 मध्ये  शासनाकडे या कर्मचार्‍यांना अस्थापनेवर सामावून घेणेबाबत मागणी केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑक्टोबर 2022 मध्ये आपले पत्र दिले होते. त्यात नगरविकास खात्याकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव तातडीने मागवून त्यात मंजूरी देण्यात यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली होती. आ.कुणाल पाटील यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील कर्मचार्‍यांना न्याय मिळाल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आ.कुणाल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

Back to top button