शशिकांत भालेकर :
पारनेर : तालुक्यातील सोळा गावच्या ग्रामपंयतीच्या निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादी, ठाकरे सेना, बाळासाहेबांची सेना व भाजपनेही दावे सांगत वर्चस्वाची हाळी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांच्या ताब्यात बहुतांश ग्रामपंचायतीची सत्ता आली. अनेक गावात आ. लंके यांच्याच समर्थकांत सत्तेसाठी लढत झाली. पारनेर तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 6 टेबवरील 11 फेरीत मतमोजणी पार पडली. तहसीलदार शिवकुमार अवळकंटे, नायब तहसीलदार गणेश आढारी यांनी 'त'ोजणी प्रक्रिया मतमोजणी सुरळीत होण्यासाठी नियोजन केले.
सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत अनेक मातब्बर निवडणूक रिंगणात उतरले होते. पॅनल प्रमुखांना सदस्य उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याने पॅनलचा खर्चही त्यांच्याच माथी पडला. भाळवणीच्या सरपंच पदासाठी पाच उमेदवारांत लढत झाली. त्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांच्या मातोश्री लिलाबाई रोहकले या 13 मतांनी विजयी होत पारनेर तालुक्यातील भाळवणीत सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीत फूट पडत तरटे यांच्या विरोधात बबलू रोहकले यांनी स्वतंत्र पॅनल केला. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय सुखर झाला.
वनकुटे येथे आ.निलेश लंके यांचे समर्थक व आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष राहुल झावरे यांच्या पत्नी स्नेहा झावरे यांना पराभवास सामोेरे जावे लागले. तेथे सुमन निवृत्ती रांधवन या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. करंदी येथे सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात उध्दव ठाकरे शिवसेनेचे नंदा भास्कर गव्हाणे यांनी बाजी मारत सत्ता हस्तगत केली. ढवळपुरी येथे पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांचे समर्थक व विद्यमान सरपंच डॉ राजेश भानगडे यांचा दारुण पराभव झाला. सोसायटीचे अध्यक्ष भागाजी गावडे यांच्या पत्नी येथे विजयी झाल्या आहेत.
पुणेवाडी येथे विद्यमान सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या गटाचा पराभव झाला असून येथे बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे यांच्या पत्नी दिपाली रेपाळे या विजयी झाल्या आहेत. चुरशीच्या झालेल्या या लढतीत मारुती रेपाळे यांनी बाजी मारत सत्ता काबीज केली आहे.गोरेगाव येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सुमन तांबे या विजयी झाल्या. बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव मधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.