नगर-शिर्डीसाठी प्रत्येकी 96 टेबल : एकाच वेळी होणार विधानसभानिहाय मतमोजणी | पुढारी

नगर-शिर्डीसाठी प्रत्येकी 96 टेबल : एकाच वेळी होणार विधानसभानिहाय मतमोजणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी (अ.जा.) या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी 4 जून रोजी नगर एमआयडीसी येथील राज्य वखार महामंडळाच्या दोन गोदामांमध्ये होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 16 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रत्येक टेबलवर चार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. नियुक्त केलेल्या उमेदवारांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी सुरू आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण 13 लाख 20 हजार 168 मतदारांनी मतदान केले आहे. ही मतमोजणी 14 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.

या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल तर पोस्टल मतमोजणीसाठी 2 टेबल असे एकूण 16 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक, एक मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 10 लाख 57 हजार 298 मतदान झाले आहे. या मतदारसंघात देखील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी 16 टेबल असणार आहेत. या 16 टेबलासाठी 64 कर्मचारी लागणार आहेत.

मतमोजणीसाठी 768 अधिकारी-कर्मचारी

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रत्येकी 384 असे एकूण 768 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मतमोजणीसाठी शक्यतो महसूल विभागातील कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मायक्रो ऑब्झर्वर हे राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी असणार आहेत.

पावसाळ्यामुळे घेतली जात आहे खबरदारी

पूर्वी वखार महामंडळाच्या एका गोदामात अहमदनगर व दुसर्‍या गोदामात शिर्डी मतदारसंघातील अशा दोन गोदामांतील स्ट्रॉगरूममध्ये मतदान यंत्रे ठेवली आहेत. सध्या पाऊस, वादळी वार्‍याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पत्र्यांचे छत असलेल्या गोदामांवर प्लास्टिक कागद टाकण्यात आले आहेत. गोदामातील वीजपुरवठा परिस्थितीची महावितरणकडून तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button