नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरु | पुढारी

नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या ११ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमधील प्रौढ बेरोजगार अर्थसाहाय्य योजना आणि मतिमंद, मेंदूपीडित बहुविकलांग दिव्यांग व्यक्तींना अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. योजनांच्या अटी, शर्तींतील दुरुस्तीनुसार लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. अशा संबंधित लाभार्थ्यांनी दरवर्षी डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला तसेच अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह महापालिका मुख्यालयातील समाजकल्याण विभागात सादर करणे आवश्यक आहे. या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांनी त्यांचे अर्थसाहाय्य नियमित सुरू ठेवण्यासाठी महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथील समाजकल्याण विभागातून हयातीच्या दाखल्याचा अर्ज प्राप्त करून घ्यावा. दि. ३० डिसेंबरपर्यंत समाजकल्याण विभागात समक्ष येऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या दिव्यांग योजनांचा अद्याप लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांनी ते पात्र ठरत असणाऱ्या योजनेंतर्गत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागाचे प्रभारी उपआयुक्त नितीन नेर यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button