

पिंपरी : शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये बाधित डेंग्यू रुग्णांच्या संख्येत 57 टक्क्यांनी घट झाली आहे. तथापि, संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. महापालिका वैद्यकीय विभागाने ही माहिती दिली आहे. महापालिका प्रशासनाकडे डेंग्यू रुग्णांच्या प्राप्त होणार्या आकडेवारीत खासगी रुग्णालयांतील रुग्णांचीदेखील नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व खासगी रुग्णालये त्याची नोंद करतात का, याविषयी साशंकताच आहे. महापालिका वैद्यकीय विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 89 बाधित रुग्ण आढळले होते.
तर, नोव्हेंबर महिन्यात हा आकडा कमी होत 38 रुग्णसंख्येवर येऊन पोहोचला. म्हणजे जवळपास 57 टक्क्याने त्यामध्ये घट झाली आहे. तर, डिसेंबर महिन्यात गेल्या 9 दिवसांमध्ये फक्त 6 बाधित रुग्ण आढळले आहेत. हिवताप हा आजार एनॉफिलस तर, डेंग्यू व चिकुनगुणिया हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात. या रोगांचा प्रसार वाढू नये म्हणून डास उत्त्पत्तीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे.
शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यात संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या 1 हजार 876 इतकी होती. नोव्हेंबर महिन्यात ही रुग्णसंख्या घटून 1 हजार 540 पर्यंत पोहोचली. म्हणजे संशयित डेंग्यू रुग्णाच्या संख्येत 17.91 टक्क्याने घट झाली आहे. तर, डिसेंबर महिन्यात गेल्या नऊ दिवसांमध्ये 210 संशयित रुग्ण आढळले आहेत.
शहरामध्ये सप्टेंबर महिन्यात मलेरियाचा (हिवताप) एक रुग्ण आढळला होता. ऑक्टोबरमध्ये दोन बाधित रुग्ण आढळले. तर, नोव्हेंबरमध्ये ही रुग्णसंख्या दुप्पट झाली. म्हणजे महिनाभरात चार बाधित रुग्ण आढळले आहे. मात्र, गेल्या नऊ दिवसांमध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
शहरामध्ये गेल्या वर्षभरात चिकुनगुणियाचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, संशयित रुग्ण आढळले आहे. चिकुनगुणियाचा सप्टेंबर महिन्यात 1 तर, ऑक्टोंबरमध्ये 4 संशयित रुग्ण आढळले होते. नोव्हेंबर महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, डिसेंबरमध्ये पुन्हा 1 संशयित रुग्ण आढळला आहे.
डेंग्यू संशयित रुग्णांची आकडेवारी जरी जास्त असली तरी बाधित होणार्या रुग्णांचे प्रमाण सध्या घटले आहे. ही चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त संशयित रुग्णांवर चाचण्या करुन नेमके बाधित रुग्ण शोधले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करणे शक्य होत आहे.
– डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.