नगर : ना थकणार, ना झुकणार.. न्याय मिळाल्याशिवाय मागे नाही हटणार ! आ . लंके उपोषणाच्या निर्णयावर ठाम | पुढारी

नगर : ना थकणार, ना झुकणार.. न्याय मिळाल्याशिवाय मागे नाही हटणार ! आ . लंके उपोषणाच्या निर्णयावर ठाम

नगर : नगर -पाथर्डीॅ, नगर -मनमाड व नगर दौंड या महामार्गांचे काम तत्काळ सुरु व्हावे यासाठी आमदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरुच होते. आ. लंकेच्या मातोश्री शकुंतलाबाई लंके या शुक्रवारी उपोषणस्थळी येताच त्यांना हुंदका फुटला. दरम्यान ना थकणार, ना झुकणार, न्याय मिळाल्याशिवाय मागे नाही हटणार, अशी हाक देत आ. लंके यांनी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची उपोषण मागे घेण्याची विनंती अवहेरली.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभर उपोषणस्थळाला जिल्हाभरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हजेरी लावत उपोषणाला पाठींबा दिला. सायंकाळी माजी आमदार दादा कळमकर, घनश्याम शेलार यांनी निवसी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली. किती दिवसांत काम पूर्ण करणार अशी लेखी मागणी त्यांनी केली. मात्र, अधिकार्‍यांनी वरिष्ठाकडे बोट दाखविले. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही आ. लंके यांचे आंदोलन सुरूच होते. तीन राष्ट्रीय महामार्गांचे काम तत्काळ सुरु करावेत या मागणीसाठी आमदार लंके यांचे बुधवारपासून आंदोलन सुरु आहे. दुसर्‍या दिवशी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या वजनात घट झाली आहे.

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी मात्र, आमदार लंके यांच्या मातोश्री शकुंतलाबाई लंके व बहिण वंदना गंधाटे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या दोघी मायलेकी सायंकाळपर्यंत उपोषणस्थळी बसून होत्या. शुक्रवारी सायंकाळी उपोषणस्थळी माजी आमदार दादा कळमकर, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, ताराचंद म्हस्के, संदेश कार्ले यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी दाखल झाले. यावेळी अ‍ॅड. सतीश पालवे यांनी जोरदार भाषण करीत लक्ष वेधून घेतले.

आम्ही साधी माणसं : आमदार मातोश्री

आम्ही साधी माणसं आहोत. माझा मुलगा नीलेश पहिल्यापासून जनतेच्या हितासाठी धावत आहे. आज जनतेसाठी लढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो उपोषण करीत आहे. अन्नपाण्यावाचून दोन दिवस काढले आहे. अन्नपाण्याशिवाय तो राहात असल्यामुळे रात्रभर डोळयाला डोळा लागला नाही. त्यामुळे सकाळी उठताच मुलाच्या प्रेमापोटी धावत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे. त्यांच्या लढाईला माझे आशिर्वाद आहेत. उपोषणाकडे सरकार लक्ष देत नाही यांची खंत वाटत आहे सांगत असताना मातोश्री शंकुतलाबाई लंके यांना अश्रू अनावर झाले.

चर्चा फिस्कटली, अधिकारी धारेवर

दादा कळमकर, घनश्याम शेलार, शिवशंकर राजळे व संदेश कार्ले यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व उपभियंता यांच्याशी चर्चा केली. आमदारांच्या निवेदनाची दखल घेतली असती तर त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली नसती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेश देऊनही तुम्ही यंत्रणा वाढविली नाही. तुमच्यावर कोणातरी राजकीय नेत्याचा दबाव आहे असा सवाल घनश्याम शेलार यांनी उपस्थित केला. आमदार उपोषण करीत असताना तुमचे मुख्य अभियंता येत नाहीत, याबबदल्ल त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

अधिकार्‍यांनी मागितला 15 दिवसांचा वेळ

2016 मध्ये कामाला मंजुरी मिळाली. 2020 मध्ये संबंधित ठेकेदाराला टर्मिनेट करण्यात आले. त्यानंतर दुसरी एजन्सी नियुक्त केली. शासनाकडे पैसे नसल्यामुळे कामे झाले नाही. आता नुकतीच निधीला मंजुरी मिळाली आहे. 15 दिवस द्या. कामातील 99 टक्के अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच काम सुरु होईल असे कार्यकारी अभियंता पालवे यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांची विनंती धुडकावली

शुक्रवारी रात्री 10 वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आमदार लंके यांनी प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले उपोषणस्थळी येताच कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हमी घेतली. मात्र, उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी भोसले यांची विनंती धुडकावत, प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय उपोषणापासून हटणार नाही अशी भूमिका घेतली.

गेल्या दोन दिवसांपासून जनतेच्या हितासाठीआपला मुलगा अन्नत्याग आंदोलन करत आहे. आई म्हणून गुरुवारी रात्रभर डोळा लागला नाही. सकाळीच उठून धडक उपोषणस्थळ गाठले. इतके करूनही सरकार लक्ष देत नाही, याची खंत आहे. हे सगळं पाहून हुंदका अनावर झाला.
                                               – शकुंतलाबाई लंके, आ. लंके यांच्या मातोश्री

जिल्ह्यातील महामार्गांची कामे सुरु होण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या आंदोलनामुळे आमच्या अंगी दहा हत्तीचे बळ आले आहे. उपोषण करण्याला धाडस लागते. ज्याच्याकडे सामाजिक बांधिलकी आहे, तोच आंदोलन करतो. आजी -माजी खासदारांमुळे हा रस्ता खराब झाला. डॉक्टर खासदारांनी भाजप जिल्हाध्यक्षांचा मेंदू तपासावा.
   – अ‍ॅड. सतीश पालवे

Back to top button