नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का | पुढारी

नाशिक : वाद वराडीने पुसला 'कायमस्वरुपी दुष्काळी' शिक्का

नाशिक : वैभव कातकाडे

दरवर्षी फेब्रुवारी महिना संपला की, चांदवड तालुक्यातील वाद वराडी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची. मार्च, एप्रिल महिन्याच्या त्या तप्त उन्हात पाण्याने कासावीस झालेले गाव कुठेतरी आपल्या हक्काचे पाणी मिळेल या आशेवर कोसो दूर जाते. शासन स्तरावरून टँकरची व्यवस्था केली जायची. पण, टँकरची वाट बघण्यातच दिवस जायचा. मात्र, शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने एकदा एखादे काम करण्याचे ठरवले तर ते काम पूर्ण होणारच, याचाच प्रत्यय अवर्षण प्रवण क्षेत्रातील चांदवड तालुक्यात आला आहे.

येथील वाद वराडी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून साडेआठ लाख रुपये खर्च करून सुमारे पावणेदोन कोटी लिटर साठवण क्षमतेच्या कृत्रिम साठवण तलावाची निर्मिती केली आहे. या तलावामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात वापराच्या पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने गाव टँकरमुक्त झाले असून, उन्हाळ्यात या गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी शासनाला दरवर्षी कराव्या लागणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे. गेल्या उन्हाळ्यात या तलावात पूर्ण पाणी भरले होते. त्यामुळे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणा यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र आहे. सद्यस्थितीत या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गरज विहिरी व हातपंपावरून भागत असून, वापरासाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी पुरवूनही तलावात अद्यापही पाणी शिल्लक आहे. या तलावाच्या सुरक्षिततेसाठी जाळीचे कंपाउंडही करण्यात आले आहे. साठवण तलावामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. साठवण तलाव उंचावर केल्याने ग्रामस्थांना गुरुत्वाकर्षणाच्या योग्य दाबाने मुबलक पाणी मिळत आहे. यामुळे गावाची ‘कायमस्वरूपी दुष्काळी’ अशी असलेली ओळख पुसली जाणार आहे.

चांदवड गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली होती. वाद वराडी गावाला उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने तालुक्यात सर्वप्रथम या गावाची उन्हाळ्यात डिसेंबरमध्येच टँकरने पाणीपुरवठ्यासाठी शासन दरबारी मागणी होत होती. परिसरात खडकाळ जमीन असल्याने नैसर्गिक स्रोत नाही व त्यातच गावासाठी असलेली नाग्यासाक्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेली होती. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे नैसर्गिक स्रोतांचे पाणी साठवून ते उन्हाळ्यात वापरण्याची संकल्पना पुढे आली. साठवण तलावाचे काम गावविकास कृती आराखड्यात समाविष्ट करून ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून साडेआठ लाख रुपये खर्च करून साठवणूक टाकी उभारण्यात आली.

तळ्याचे अस्तरीकरण

तळ्यात प्लास्टिक कागद अस्तरीकरण करून पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. विहिरीतील व नैसर्गिक स्रोतातील वाहून जाणारे पाणी पावसाळ्यात पंप लावून या तळ्यात साठविण्यात आले. फेब्रुवारीपासून पाणीटंचाई भासू लागल्यानंतर या तळ्यातील पाणी जलवाहिनीद्वारे गावातील सार्वजनिक विहिरीत घेऊन ते नळाद्वारे गावातील सुमारे १२५ कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यातून ग्रामस्थांना टंचाईकाळात सुमारे चार महिने पुरेल इतके वापराचे मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, टँकर आल्यानंतर होणारे वादविवाद व महिला, ग्रामस्थांचा होणारा त्रास कमी झाला आहे. ऐन उन्हाळ्यात टंचाईचे तीन महिने ग्रामस्थांना या साठवण तलावातून पाणी पुरविण्यात आल्याने वाद वराडी हे गाव टँकरमुक्त झाले आहे.

वाद वराडी या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाला सुमारे १५ ते २० लाख रुपये खर्च येत होता. साठवण तलावातील प्लास्टिक कागदाची वयोमर्यादा सुमारे १० वर्षे असून, पुढील १० वर्षांत शासनाच्या सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे. ही योजना पूर्व भागातील परिसरातील दरेगाव, निमोण या गावांनाही राबविण्याचे विचाराधीन आहे. – महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड.

हेही वाचा:

Back to top button